आलिशान आयुष्य सोडून मृत्यूची वाट पाहतायेत ८२ वर्षीय वृद्ध व्यक्ती; पण कशासाठी?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2023 02:53 PM2023-04-26T14:53:26+5:302023-04-26T14:54:01+5:30
आम्ही मृत्यूला आमंत्रण दिलंय ते आमचे सर्वात महत्त्वाचे पाहुणे आहेत असं शास्त्री यांनी म्हटलंय.
नवी दिल्ली - ही कहाणी आहे अनेक वृद्धांपैकी एकाची. जे वाराणसीच्या गंगा नदी किनारी बसून मृत्यूची प्रतिक्षा करत आहेत. हे खूप भावनिक आहे. या वृद्धाचे नाव मुरली मनोहर शास्त्री असं आहे. वयाच्या ८२ व्या वर्षी आलिशान जीवन सोडून ते पत्नीसह उत्तर प्रदेशातील वाराणसी इथे आले. हैदराबाद सोडून त्यांना एक दशक झाला असेल. शास्त्री हे कॉलेजमध्ये प्राध्यापक होते.
आता शास्त्री यांना वाराणसीत मृत्यू झाल्यानं मृत्यू आणि पुनर्जन्मचे चक्र तुटेल अशी आशा आहे. मोक्ष प्राप्तीसाठी बहुतांश हिंदू या आस्थेत विश्वास ठेवतात. रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार, आम्ही मृत्यूला आमंत्रण दिलंय ते आमचे सर्वात महत्त्वाचे पाहुणे आहेत. आम्हाला याठिकाणी मृत्यू येईल याचा गर्व आहे असं म्हणत त्यांनी गंगा नदीच्या पाण्यात तीन वेळा डुबकी मारली.
ऐश आरामाचा मोह नाही
मुरली मोहन शास्त्री म्हणतात, वाराणसीत राहण्याची प्रेरणा आईकडून मिळाली. ती याठिकाणी राहायची. आता मला जगाच्या ऐश आरामाचा काही मोह नाही. आता जीवनाचा अखेरचा टप्पा ध्यान आणि प्रार्थनेत घालवायचा आहे. संसार सुख हवेसे वाटणाऱ्यांना देवाकडे जाता येत नाही. जितके शक्य तितके या सर्व गोष्टींचा त्याग करा आणि याच्यामागे धावू नका असं त्यांनी सांगितले.
वाराणसी एक असे शहर आहे. ज्याठिकाणी देशभरातून लोक गंगास्नान आणि हिंदू प्रथा परंपरेनुसार पूजा करण्यासाठी येतात. याठिकाणी जन्मापासून मृत्यूपर्यंत सगळ्या प्रथा पार पाडल्या जातात. ८० वर्षीय राम प्यारी यादेखील इथं राहतात. त्यांचे पती बेडवरच आहेत. सध्या हे अखेरचे दिवस जगत आहेत. मनुष्याच्या आयुष्यात इतके काही असते ज्यामुळे तो वैतागतो. जर मोक्षप्राप्ती झाली तर या त्रासातून त्याला मुक्ती मिळते. त्यामुळे अनेक वृद्ध गंगाकिनारी मोक्षप्राप्तीसाठी मृत्यूची वाट पाहत आहेत.