पंजाबमधील ८८ वर्षीय आजोबांचं फळफळलं नशीब; ५ कोटी मिळाले, कुटुंबात एकच जल्लोष!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2023 09:42 AM2023-01-20T09:42:37+5:302023-01-20T09:47:16+5:30
पंजाबमधील मोहालीत राहणाऱ्या एका ८८ वर्षीय व्यक्तीला अचानक ५ कोटी रुपयांची लॉटरी लागली.
सध्याच्या युगात माणसाचे नशीब काही क्षणात बदलू शकते. असाच काहीसा प्रकार पंजाबमधील मोहालीमध्ये घडला. एका ८८ वर्षीय व्यक्तीला अचानक ५ कोटी रुपयांची लॉटरी लागली आणि ही बातमी ऐकून तो आनंदी झाला.
सदर प्रकरण मोहालीच्या डेराबसीचे आहे. जिथे त्रिवेदी कॅम्प गावात राहणाऱ्या मंदिराचे महंत द्वारका दास यांना ५ कोटी रुपयांची लॉटरी लागली. लॉटरीत ५ कोटी रुपये जिंकल्यानंतर द्वारका दास यांच्या कुटुंबात जल्लोषाचे वातावरण आहे. कुटुंबीयांनी वृद्धाला फुलांचा हार घालून हा विजय साजरा केला.
सदर हे लॉटरीचे तिकीट जिरकपूर येथील महंत द्वारका दास यांच्या नातवाने त्यांच्या आजोबांच्या नावाने खरेदी केले होते. लोकेश कुमार नावाच्या व्यक्तीने सांगितले की, त्याचे जिरकपूर-पंचकुला रोडवर लॉटरीचे दुकान आहे. महंताचे नातू निखिल शर्मा लोहरीनिमित्त दुकानात आला आणि मकर संक्रांतीचे बंपर तिकीट खरेदी केले. तो म्हणाला की, योगायोगाने त्याच्या आजोबांनी ही लॉटरी जिंकली आणि ते लगेच करोडपती झाले.
महत्त्वाचे म्हणजे महंत यांचा मुलगा नरेंद्र कुमार हा ऑटोचालक आहे. लॉटरी जिंकल्यानंतर त्याच्या घरी अभिनंदनाचा ओघ सुरू झाला आहे. लॉटरीत ५ कोटी रुपये जिंकल्यानंतर महंत द्वारका दास म्हणाले की, आम्हाला आनंद होत आहे. जेव्हा त्याला विचारण्यात आले की, आता तुम्ही करोडपती झालात, त्यावर ते म्हणाले की, देवाने सर्वांना करोडपती बनवावे. तसेच मी जवळपास ३५-४० वर्षांपासून लॉटरीची तिकिटे खरेदी करत आहे, पण आता त्याच्या नशिबाचा फळफळले.
लॉटरीत मिळालेल्या पैशाचे काय करणार असा प्रश्न त्यांना विचारला असता महंत द्वारका दास यांनी या वयात या पैशांचे काय करणार? असे उत्तर दिले. दरम्यान महंत द्वारका दास यांना दोन मुलं आणि बायको आहेत, तिघांमध्येही ते पैसे समान वाटून देणार असल्याचं त्यांनी सांगितले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"