बिहारमध्ये पूरग्रस्तांच्या मदतीला गेलेलं हवाई दलाचं हेलिकॉप्टर पाण्यात कोसळलं, लोकांनी आतील सामान पळवलं
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2024 04:42 PM2024-10-02T16:42:26+5:302024-10-02T16:43:02+5:30
Airforce Helicopter Fell Into Water: नद्यांना आलेल्या पुरामुळे सध्या बिहारमध्ये बिकट परिस्थिती निर्माण झालेली आहे. दरम्यान, या पुरामुळे संकटात सापडलेल्या लोकांच्या मदतीसाठी गेलेलं हवाई दलाचं एक हेलिकॉप्टर बिहारमधील मुझफ्फपूर येथील पूरग्रस्त भागात कोसळल्याची माहिती समोर येत आहे.
नद्यांना आलेल्या पुरामुळे सध्या बिहारमध्ये बिकट परिस्थिती निर्माण झालेली आहे. दरम्यान, या पुरामुळे संकटात सापडलेल्या लोकांच्या मदतीसाठी गेलेलं हवाई दलाचं एक हेलिकॉप्टर बिहारमधील मुझफ्फपूर येथील पूरग्रस्त भागात कोसळल्याची माहिती समोर येत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार मुझफ्फरपूर येथे पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मदत घेऊन दात असलेलं हे हेलिकॉप्टर पुराच्या पाण्यात कोसळलं.
या हेलिकॉप्टरने सीतामढी येथून मदत साहित्य घेऊन मुझफ्फरपूरच्या दिशेने उड्डाण केले होते. तिथे या साहित्याचं वाटप करण्यात येणार होतं. मात्र तत्पूर्वीच हे हेलिकॉप्टर अपघातग्रस्त होऊन पुराच्या पाण्यात कोसळलं. हेलिकॉप्टरला अपघात झाल्याची माहिती मिळताच एसडीआरएफची टीम आणि ग्रामस्थांनी मदत कार्याला सुरुवात केली. तसेच हेलिकॉप्टरमध्ये अडकलेल्या कर्मचाऱ्यांना बाहेर काढले. मात्र यादरम्यान, काही लोकांनी होडी घेऊन दुर्घटनाग्रस्त हेलिकॉप्टरमधून मदत साहित्य लुटण्याचा प्रयत्न केल्याचाही प्रकार घडला.
या अपघाताबाबत माहिती देताना आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अप्पर मुख्य सचिव प्रत्यय अमृत यांनी सांगितले की, पायटलाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली. त्याने हेलिकॉप्टरचं इंजिन बिघडल्यानंतर हेलिकॉप्टर पाण्यामध्ये सुखरूप उतरवलं. मात्र पाण्यात उतरत असताना ते कोसळलं. हवाई दलाचे सर्व जवान आणि पायलट सुरक्षित बटावले आहेत. त्यांना अधिक उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
दरम्यान, या घटनेनंतर बिहार सरकारने एसडीआरएफच्या टीमचा सत्कार करण्याचा निर्णय घेतला आहे. आपत्ती व्यवस्थापन विभागाचे एसीएस प्रत्यय अमृत यांनी सांगितले की, या अपघातानंतर एसडीआरएफच्या टीमने उत्तम पद्धतीने बचाव मोहीम राबवली. त्यासाठी एसडीआरएफच्या जवानांचा सत्कार केला जाईल. दरम्यान, मुझफ्फरपूर येथे हेलिकॉप्टर कोसळल्यानंतर स्थानिक लोक घटनास्थळी सेल्फी काढताना आणि व्हिडीओ तयार करून सोशल मीडियावर टाकतानाही दिसत होते.