क्या बात है! रुग्णासाठी हार्ट अन् किडनी नेणाऱ्या रुग्णवाहिकेने ९ मिनिटात कापलं १४ किमी अंतर
By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2024 11:08 AM2024-02-01T11:08:40+5:302024-02-01T11:10:08+5:30
हार्ट आणि किडनी घेऊन येणाऱ्या रुग्णवाहिकेने ट्रॅफिक पोलिसांच्या मदतीने १४ किलोमीटरचं अंतर अवघ्या ९ मिनिटांत कापलं आहे.
नवी दिल्ली : गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णाला वेळीच उपचार मिळणं गरजेचं असतं. मात्र आपल्या आरोग्य व्यवस्थेतील कमतरतेमुळे अनेकदा उपचाराविना रुग्णांना जीव गमवावा लागतो. परंतु काही वेळा यंत्रणेच्या संवेदनशीलमुळे अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही शक्य होतात आणि एखाद्याला जणू नवा जन्मच मिळतो. अशीच एक घटना नोएडात घडली आहे. गौतमबुद्धनगरातील ट्रॅफिक पोलिसांनी चिल्ला बॉर्डरपासून सेक्टर १२८ मध्ये असणाऱ्या एका रुग्णालयापर्यंत ग्रीन कॉरिडॉर तयार करत विक्रमी वेळेत रुग्णवाहिका पोहोचवली आहे. हार्ट आणि किडनी घेऊन येणाऱ्या रुग्णवाहिकेने ट्रॅफिक पोलिसांच्या मदतीने १४ किलोमीटरचं अंतर अवघ्या ९ मिनिटांत कापलं आहे.
वाहतूक विभागाचे डीसीपी अनिल यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीतील अपोलो हॉस्पिटल येथून किडनी आणि हार्ट सेक्टर १२८ मधील एका रुग्णालयात न्यायचं होतं. एका रुग्णाची शस्त्रक्रिया होणार होती. वाहतूक पोलिसांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी नियोजनास सुरुवात केली आणि रुग्णवाहिकेसाठी ग्रीन कॉरिडॉर तयार करण्यात आला.
चिल्ला बॉर्डर येथून वाहतूक पोलिसांनी १ वाजून ४२ मिनिटांनी रुग्णवाहिका सोबत घेतली आणि चिल्ला बॉर्ड ते सेक्टर १२८ मधील जेपी रुग्णालय हे १४ किलोमीटरचं अंतर ९ मिनिटांत पूर्ण करण्यात आलं.
दरम्यान, एका रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी वाहतूक पोलिसांनी दाखवलेल्या या तत्परतेचं सर्वच स्तरांतून कौतुक केलं जात आहे.