लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2024 06:40 AM2024-11-16T06:40:51+5:302024-11-16T06:41:05+5:30
लॉटरी किंग विरोधात दाखल एफआयआरच्या अनुषंगाने सुरू असलेली चौकशी बंद करण्याचा निर्णय तामिळनाडू पोलिसांनी नुकताच घेतला होता.
चेन्नई : लॉटरी किंग सँटियागो मार्टिन याच्या कार्यालयातून ईडीने शुक्रवारी ८.८ कोटी रुपयांची रोकड जप्त केली, असे सूत्रांनी सांगितले. मार्टिन यांनी राजकीय पक्षांना निवडणूक रोख्यांद्वारे १३०० कोटी रुपयांहून अधिक देणगी दिली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे ही निवडणूक रोखे योजना रद्द झाली होती.
मार्टिन याच्या विरोधात मनी लाँडरिंग प्रकरणाच्या चौकशीसाठी ईडीने अनेक राज्यांमध्ये धाडी घातल्या होत्या. त्याच्या विरोधात कारवाईस मद्रास उच्च न्यायालयाने नुकतीच परवानगी दिली. लॉटरी किंग विरोधात दाखल एफआयआरच्या अनुषंगाने सुरू असलेली चौकशी बंद करण्याचा निर्णय तामिळनाडू पोलिसांनी नुकताच घेतला होता. यासंदर्भात पोलिसांनी केलेली विनंती कनिष्ठ न्यायालयाने मान्य केली होती.
ईडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, मार्टिन, त्याचा जावई आधव अर्जुन व त्यांच्याशी संबंधित कोईम्बतूर, फरिदाबाद, लुधियाना, कोलकाता येथील लोकांच्या किमान २० ठिकाणांवर ईडी धाडी टाकल्या होत्या.