कानपूरपाठोपाठ अजमेरमध्ये ट्रेनला अपघात घडवण्याचा प्रयत्न, रुळांवर सापडला सिमेंटचा ब्लॉक
By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2024 09:39 AM2024-09-10T09:39:43+5:302024-09-10T09:42:04+5:30
Indian Railway News: उत्तर प्रदेशमधील कानपूरनंतर आता राजस्थानमध्येही रुळांवर अवजड वस्तू ठेवून रेल्वेला अपघात घडवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. राजस्थानमधील अजमेर जिल्ह्यामध्ये रेल्वे ट्रॅकवर सुमारे ७० किलो वजनाचा सिमेंटचा ब्लॉक ठेवण्यात आल्याचं समोर आलं.
उत्तर प्रदेशमधील कानपूरनंतर आता राजस्थानमध्येही रुळांवर अवजड वस्तू ठेवून रेल्वेला अपघात घडवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. राजस्थानमधील अजमेर जिल्ह्यामध्ये रेल्वे ट्रॅकवर सुमारे ७० किलो वजनाचा सिमेंटचा ब्लॉक ठेवण्यात आल्याचं समोर आलं. या माध्यमातून एखा मालगाडीला अपघात घडवण्याचा प्रयत्न झाल्याचं सांगण्यात येत आहे. सुमारे एक किलोमीटर अंतरापर्यंत रुळांवर सिमेंटचे ब्लॉक ठेवण्यात आल्याचे समोर आले आहे. दरम्यान, सोमवारी कानपूरमध्ये रेल्वे ट्रॅकवर सिलेंडर ठेवण्यात आला होता. त्याला कालिंदी एक्स्प्रेसची धडक बसली होती.
मिळालेल्या माहितीनुसार अजमेरमधील सराधना आणि बांगड ग्राम रेल्वे स्थानकांच्या दरम्यान दोन ठिकाणी सिमेंटचे सुमारे १०० किलो वजनाचे ब्लॉक ठेवण्यात आले होते. दोन्ही ठिकाणांमध्ये सुमारे एक किलोमीटरचं अंतर होतं. या प्रकरणी डीएफसीसी कर्मचारी रवी बुंदेला आणि विश्वजित दास यांनी एआयआर दाखल केली आहे.
एफआयआरमध्ये करण्यात आलेल्या उल्लेखानुसार ८ सप्टेंबर रोजी रात्री १०.३६ च्या सुमारास रेल्वे रुळांवर सिमेंटचा ब्लॉक ठेवण्यात आल्याची माहिती मिळाली. घटनास्थळी पोहोचल्यावर तो तुटलेल्या स्थितीत सापडला. आणखी एक किमी अंतरावर आणखी एक ब्लॉक तुटून बाजूला पडलेला आढळला. दोन्ही ब्लॉक वेगवेगळ्या ठिकाणी ठेववण्यात आले होते.
त्यानंतर डीएफसीसी आणि रेल्वे प्रोटेक्शन फोर्स यांनी मिळून सराधना येथून बांगड ग्रामपर्यंत पेट्रोलिंग केली. मात्र या मार्गात सारं काही सुरळीत असल्याचं दिसून आलं. दरम्यान, मागच्या एका महिन्यात राजस्थानमध्ये रेल्वेला अपघात घडवण्याच्या प्रयत्नाची ही तिसरी घटना आहे. याआधी २८ ऑगस्ट रोजी बारां येथील छबडा येथे मालगाडीच्या मार्गावर दुचाकीचं भंगार ठेवून ट्रेन रुळांवरून उतरवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.