संशयाचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न- मुख्य निवडणूक आयुक्त राजीवकुमार यांचा पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2024 10:24 AM2024-05-26T10:24:54+5:302024-05-26T10:25:46+5:30

मतदानाच्या आकडेवारीवरुन लोकांची दिशाभूल, आम्ही सर्व सांगणार

An attempt to create an atmosphere of doubt says Chief Election Commissioner Rajeev Kumar's counterattack | संशयाचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न- मुख्य निवडणूक आयुक्त राजीवकुमार यांचा पलटवार

संशयाचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न- मुख्य निवडणूक आयुक्त राजीवकुमार यांचा पलटवार

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: मतदानाच्या आकडेवारीच्या मुद्द्यावरुन संशयाचे वातावरण निर्माण केले जात आहे. आम्ही याबाबत सर्वांना एक दिवशी सविस्तर सांगू. लाेकांची कशी दिशाभूल केली जाते, याचा खुलासा करु, असे देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीवकुमार यांनी सांगितले.

राजीव कुमार यांनी सहकुटुंब दिल्लीत मतदानाचे कर्तव्य पार पाडले. केंद्र निहाय मतदानाची आकडेवारी तसेच फाॅर्म १७ची माहिती जाहीर करण्याचे निवडणूक आयाेगाला निर्देश देण्याची मागणी करणारी याचिका सर्वाेच्च न्यायालयाने फेटाळली आहे. यासंदर्भात राजीव कुमार प्रथमच बाेलले आहेत. ते म्हणाले, न्यायालयाने सत्य स्वीकारले आहे. परंतु,  संशयाचे वातावरण निर्माण करण्यात येत आहे. याबाबत काय खेळ खेळला जात आहे, संशय का निर्माण केला जात आहे? लाेकांची कशी दिशाभूल केली, हे आम्ही सांगू, असे ते म्हणाले.

जम्मू-काश्मिरात लवकरच विधानसभा निवडणूक

जम्मू-काश्मीर या केंद्रशासित प्रदेशात विधानसभा निवडणुकाची प्रक्रिया आम्ही लवकरच सुरू करणार आहोत, असे राजीवकुमार यांनी सांगितले. ते म्हणाले, की जम्मू-काश्मीरमध्ये लोकसभा निवडणुकांत उत्तम प्रमाणात झालेले मतदान पाहून आनंद झाला आहे. महिलांनी मोठ्या संख्येने मतदान केले आहे. मतदारांनी दाखविलेल्या उत्साह, विश्वासामुळे लोकशाहीची पाळेमुळे आणखी घट्ट रुजण्यास मदत झाली आहे. जनतेला लोकनियुक्त सरकारची आवश्यकता असते. जम्मू-काश्मीरच्या जनतेला ते मिळविण्यास पात्र आहेत. तेथे विधानसभा निवडणुका घेण्यासाठी आम्ही लवकर प्रक्रिया सुरू करणार आहोत, असे राजीवकुमार म्हणाले.

३७० कलम रद्द झाल्यानंतर होणार पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकांची प्रक्रिया सुमारे एक महिनाभर चालते. त्या केंद्रशासित प्रदेशातील मतदारसंघांची पुनर्रचना करण्यात आली असून त्यामुळे विधानसभेच्या जागांची संख्या ८३ वरून ९० पर्यंत पोहोचली आहे. ३० सप्टेंबरच्या आत जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुका घ्या, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला दिला आहे.

किती जणांनी मतदान केले? मतदारसंघनिहाय आकडे प्रसिद्ध

पहिल्या पाच टप्प्यांत झालेल्या मतदानाची मतदारसंघनिहाय मतदानाची आकडेवारी शनिवारी निवडणूक आयोगाने जारी केली. तसेच मतदान झाल्यावर त्यात कोणताही बदल अशक्य असल्याचे सांगत निवडणूक प्रक्रियेत अडथळा आणण्याचा प्रयत्न केला जात असल्याचेही आयोगाने म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाने एका एनजीओची मतदान केंद्रनिहाय मतदानाची टक्केवारी जाहीर करण्याची मागणी करणारी याचिका फेटाळली हाेती. त्यानंतर आयोगाने पहिल्या पाच टप्प्यातील मतदारसंघनिहाय आकडेवारी जाहीर केली. त्यानुसार मतदारसंघातील मतदारांची संख्या आणि किती मतदारांनी मतदान केले, ही माहिती प्रसिद्ध केली. आतापर्यंत आयोगाकडून केवळ मतदानाची टक्केवारी जाहीर केली जात होती.

सर्वाधिक मतदान कुठे ?

  • धुबरी, आसाम    ९२.०८ 
  • ओंगाेल, आंध्र प्रदेश    ८७.०६ 
  • चित्तूर, आंध्र प्रदेश    ८५.७७ 
  • नरसरावपेठ, आंध्र प्रदेश    ८५.६५ 
  • बापटला, आंध्र प्रदेश    ८५.४८ 
  • सर्वात कमी मतदान कुठे?
  • श्रीनगर, जम्मू-काश्मीर    ३८.४९ 
  • नवाडा, बिहार    ४३.१७ 
  • हैदराबाद, तेलंगणा    ४८.४८ 
  • अल्मोडा, उत्तराखंड    ४८.७४ 
  • सिकंदराबाद, तेलंगणा    ४९.०४ 

(आकडे टक्क्यांमध्ये)

लाेकांच्या मनात संशय कसा निर्माण हाेताे? कधी ईव्हीएम नीट काम करीत नाही, कदाचित मतदार याद्या चुकीच्या आहेत किंवा मतदानाच्या आकडेवारीत हेराफेरी झाली आहे. सर्वाेच्च न्यायालयाने तर उत्तर दिले आहे. मात्र, आम्हीही आमचे उत्तर देऊ आणि निश्चितच देऊ. 
-राजीवकुमार, मुख्य निवडणूक आयुक्त

Web Title: An attempt to create an atmosphere of doubt says Chief Election Commissioner Rajeev Kumar's counterattack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.