आठ वर्षांचा मंगोलियन बालक तिबेटींचे तिसरे धर्मगुरू; चीनला दिला जोरदार धक्का
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2023 09:23 AM2023-03-27T09:23:02+5:302023-03-27T09:23:29+5:30
दलाई लामा यांनी केली निवड
धर्मशाला : ८७ वर्षे वयाचे तिबेटचे धर्मगुरू दलाई लामा यांनी चीनला जोरदार धक्का दिला आहे. त्यांनी अमेरिकेत जन्मलेल्या आठ वर्षे वयाच्या एका मंगोलियन मुलाला तिबेटचा तिसरा धर्मगुरू केले आहे. या पदासाठी आवश्यक असलेले सर्व धार्मिक विधी दलाई लामा यांनी हिमाचल प्रदेशमधील धर्मशाला येथे पार पाडले.
तिबेटचा तिसरा धर्मगुरू नेमण्याचा सोहळा ८ मार्चला पार पडला. त्याची माहिती आता सर्वत्र प्रसारित करण्यात आली. या सोहळ्याला ६०० मंगोलियन लोक उपस्थित होते. याप्रसंगी दलाई लामा यांनी सांगितले की, तिबटेचा तिसरा धर्मगुरू म्हणून नेमण्यात आलेल्या मुलाला एक जुळा भाऊदेखील आहे. धर्मगुरू बनलेल्या मुलाच्या रूपाने १०वे खलखा जेटसन थम्पा रिनपोछे या महान व्यक्तीने पुनर्जन्म घेतला आहे अशी आमची श्रद्धा आहे. आमच्या पूर्वजांचे चक्रसंवर येथील कृष्णाचार्य वंशाशी घनिष्ट संबंध होते. त्यांच्यापैकी एका व्यक्तीने मंगोलिया येथे मठाची स्थापना केली होती. त्यामुळे तिबेटींचा तिसरा धर्मगुरू हा मंगोलियाशी संबंधित आहे ही भाग्याची गोष्ट असल्याचे दलाई लामा यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)
राजकीयदृष्ट्या महत्त्वाची निवड
दलाई लामा यांनी तिसऱ्या धर्मगुरूंची केलेली निवड राजकीयदृष्ट्याही महत्त्वाची मानली जात आहे. तिबेटींचा नवा धर्मगुरू निवडण्याचा अधिकार आम्हालाच आहे असा दावा चीनने केला होता. १९९५ मध्ये दलाई लामा यांनी तिबेटींचा दुसरा धर्मगुरू म्हणून पंचेन लामा याची निवड केली होती.
कोण आहे तिसरा धर्मगुरू?
मंगोलियात गणित विषयाचे अध्यापन करणाऱ्या प्राध्यापकाच्या जुळ्या मुलांपैकी एकाला दलाई लामा यांनी तिबेटचा तिसरा धर्मगुरू केले आहे. अगुदाई व अल्चिताई अशी या जुळ्या मुलांची नावे आहेत. मात्र, त्यापैकी नेमके कोणत्या मुलाला धर्मगुरू करण्यात आले, त्याची माहिती सुरक्षेच्या कारणापायी जाहीर करण्यात आली नाही. त्या मुलाची आजी मंगोलियातील संसदेची माजी सदस्य आहे.