देशाला लाजिरवाणी घटना! मणिपूर पोलिसांच्या ताब्यातून तरुणींना नेलेले, त्यांच्यासमोरच सगळे घडले...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2023 02:30 PM2023-07-20T14:30:24+5:302023-07-20T14:31:11+5:30
मणिपूर हिंसाचाराचा काळा चेहरा जगासमोर, सर्वोच्च न्यायालयाने घेतली दखल, तुम्हाला जमत नसेल तर आम्ही कारवाई करू, राज्य आणि केंद्र सरकारला तंबी दिली.
मणिपूर गेल्या दोन-तीन महिन्यांपासून जळत आहे. दोन समाजांमध्ये तेढ निर्माण झालेली आहे. माणसे मारली जात आहेत. हे पुरेसे नसताना याहूनही लाजिरवाणी घटना समोर येत आहे. सोशल मीडियावर मणिपूरमधील या हादरवणाऱ्या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर देशवासियांची मान शरमेने खाली झुकली आहे. सारेकाही पोलिसांसमोरच घडले आहे, परंतू गुन्हा ४९ दिवसांनी तर पहिली अटक ७८ दिवसांनी झाली आहे. यामुळे आता अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मणिपूर सरकारही कारवाईच्या पवित्र्यात आले आहे. मणिपूर सरकार आणि प्रशासनावर निष्काळजीपणाचा आरोप होत आहे. या मुद्द्यावरून केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारला विरोधक लक्ष्य करत आहेत. पीएम मोदींनीही ही घटना 140 कोटी भारतीयांसाठी लाजिरवाणी असल्याचे म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाने या घटनेची स्वत:हून दखल घेत केंद्र आणि राज्याकडून केलेल्या कारवाईचा अहवाल मागवला आहे. जर सरकारने कारवाई केली नाही तर आम्ही करू, असे न्यायालयाने कडक शब्दात सांगितले आहे.
नेमके काय घडलेले....
या लाजिरवाण्या घटनेची तक्रार १८ मे रोजी करण्यात आली होती. एफआयआरनुसार पिडीतांनी सांगितले की, ४ मे रोजी दुपारी ९०० ते १००० जणांच्या जमावाने थोबलमधील गावावर हल्ला केला. ते मैतेई समाजाचे होते. घरांना आगी लावण्यात आल्या. घरातील पैसे, दागिने यासह किंमती वस्तू लुटण्यात आल्या.
हल्ला झाल्याचे समजताच तीन महिला त्यांचे वडील आणि भावासोबत जंगलाकडे पळाले. पोलिसांच्या टीमने त्यांना वाचविले आणि पोलीस ठाण्यात नेण्यात येत होते. तेवढ्यात जमावाने पोलिसांना थांबविले आणि त्यांच्याकडून त्या महिला आणि त्यांच्या वडील-भावाला हिसकावून घेतले. पोलिस ठाणे तेथून दोन किमीवर होते. पोलिसांच्या समोरच जमावाने वडिलांची हत्या केली. यानंतर तिथेच महिलांना कपडे काढण्यास मजबूर करण्यात आले. एका महिलेचे वय २१ वर्षे, दुसरीचे ४२ आणि तिसरीचे ५२ वर्षे होते.
त्या निर्वस्त्र महिलांना जमावाच्या पुढे चालण्यासाठी दबाव आणला गेला. यावेळी त्यांच्यासोबत छेडछाड करण्यात येत होती. २१ वर्षांच्या तरुणीवर जमावाने सामुहिक बलात्कार केला. तिच्या भावाने तिला वाचविण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याला ठार मारण्यात आले. हा प्रकार घडत असताना दोन महिलांना त्यांच्या काही ओळखीच्या लोकांनी तिथून बाजुला नेत जमावाच्या तावडीतून सोडविले.