जम्मू काश्मीरमधील सोपोरमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, एक दहशतवादी ठार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2024 05:28 PM2024-08-24T17:28:17+5:302024-08-24T17:35:10+5:30
सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला असून शोध मोहीम हाती घेतली आहे. या भागात आणखी दहशतवादी असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
जम्मू-काश्मीरमधील रफियााबाद, सोपोर येथे सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत आणखी एक दहशतवादी ठार झाला. सोपोर पोलीस आणि ३२ राष्ट्रीय रायफल्सच्या संयुक्त कारवाईत ही कारवाई करण्यात आली. सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला असून शोध मोहीम हाती घेतली आहे. या भागात आणखी दहशतवादी असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
गेल्या काही दिवसांपासून पोलिसांसह लष्कर दहशतवाद्यांना शोधून त्यांना ठार करण्यासाठी शोध मोहीम राबवत आहे. सोमवारी डुडूच्या चील भागात दहशतवाद्यांनी संयुक्त गस्ती दलावर गोळीबार केला, ज्यामध्ये CRPF निरीक्षक कुलदीप कुमार शहीद झाले.
नितीश कुमारांचा JDU पक्षातच राजकीय 'सर्जिकल स्ट्राईक'; बिहारच्या राजकारणात खळबळ
जम्मू-काश्मीरमध्ये १० वर्षांनंतर विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. येथे होणाऱ्या निवडणुकीत कोणताही गोंधळ होऊ नये, यासाठी केंद्र सरकारने मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. जम्मू-काश्मीरमध्ये आतापर्यंत निमलष्करी दलाच्या सुमारे ३०० कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत.
जम्मू-काश्मीरमध्ये होणाऱ्या निवडणुकीत पाकिस्तानकडून सुरू असलेल्या सर्व कारवायांना चोख प्रत्युत्तर देण्यासाठी सुरक्षा दलांकडून सातत्याने शोध मोहीम राबवली जात आहे. या अंतर्गत, गुरुवारी २२ ऑगस्ट२०२४ संध्याकाळी, नियंत्रण रेषा ओलांडून भारतीय सीमेत घुसलेल्या एका पाकिस्तानी घुसखोराला सुरक्षा दलांनी अटक केली. अझहर नावाच्या या घुसखोराला नियंत्रण रेषेवर चाकण दा बागजवळ पकडण्यात आले.
गेल्या काही महिन्यांपासून जम्मू भागात दहशतवादी कारवाया वाढल्या आहेत. पीर पंजालच्या दक्षिणेकडील भागात, जेथे घनदाट जंगले आणि उंच टेकड्या आहेत, अशा भागांमुळे दहशतवाद्यांना लपण्यास मदत होते. या महिन्याच्या सुरुवातीला केंद्र सरकारने जम्मू आणि काश्मीरमध्ये नागरिक, लष्कराचे जवान आणि छावण्यांना लक्ष्य करणाऱ्या दहशतवाद्यांचा सामना करण्यासाठी एक नवीन सुरक्षा फ्रेमवर्क तयार करत असल्याचे सांगितले होते.