नवऱ्याच्या हत्येला नर्स देत होती आत्महत्येचा रंग; १३ वर्षांच्या मुलीने उघड केले वडिलांच्या हत्येचे रहस्य
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2022 04:38 PM2022-12-04T16:38:21+5:302022-12-04T16:39:33+5:30
उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये एका नर्सने आपल्या पतीची हत्या केल्याची घटना घडली आहे.
गाझियाबाद : उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये एका नर्सने आपल्या पतीची हत्या केली असल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या हत्येला आत्महत्येचा रंग देण्याचा प्रयत्नही करण्यात आला. मात्र आरोपी नर्सच्या १३ वर्षांच्या मुलीने या हत्येचे संपूर्ण रहस्य पोलिसांसमोर उघड केले आहे. पोलिसांनी संबंधित नर्सच्या मोबाईलची झडती घेतल्यानंतर तिला तिच्या प्रियकरासह अटक केली आहे.
दरम्यान, पोलिसांना रूग्णालयातून माहिती मिळाली होती की एका व्यक्तीने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. ही माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून गुन्हा दाखल केला. पोलिसांनी शवविच्छेदन केले असता मृताच्या गळ्यावर काही खुणा असल्याचे दिसून आले. कोणीतरी गुदमरून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचे या खुणा दर्शवत होत्या. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आणि मृत व्यक्तीच्या पत्नीची चौकशी सुरू केली.
मुलीने वडिलांच्या हत्येचे रहस्य केले उघड
पोलिसांच्या चौकशीदरम्यान, महिलेने हत्येचा आरोप फेटाळला, मात्र तिच्या १३ वर्षांच्या मुलीने हत्येची संपूर्ण कहाणी पोलिसांना सांगितली. मुलीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, तिने स्वत: आईने वडिलांच्या चेहऱ्यावर उशी ठेवून त्याची हत्या करताना पाहिले आहे. यानंतर पोलिसांनी पुन्हा कविता या नर्सला ताब्यात घेऊन कडक चौकशी केली. या चौकशीत कविताने हत्येची कबुली दिली.
पतीच्या मारहाणीला कंटाळली होती नर्स
आरोपी नर्सने हत्येची कबुली देताना पोलिसांना सांगितले, दारू पिऊन तिचा पती महेश रोज तिला मारहाण करायचा. २९ नोव्हेंबरलाही दोघांमध्ये भांडण झाले होते. यानंतर महेश झोपी गेल्यावर तिने त्यांचे तोंड उशीने दाबले. महेश मरेपर्यंत तिने उशी दाबून धरली. त्यानंतर ती तिच्या पतीचा मृतदेह त्याच रुग्णालयात घेऊन गेली जिथे ती काम करत होती. याशिवाय तिने या हत्येला आत्महत्येचा रंग देण्याचा प्रयत्न केला.
महिलेच्या प्रियकरालाही केली अटक
कविता ज्या हॉस्पिटलमध्ये काम करते, त्या हॉस्पिटलमध्ये विमा विभागात काम करणाऱ्या विनय वर्माशी तिचे संबंध असल्याचे पोलिसांनी सांगितले. दोघांच्या व्हॉट्सॲप चॅटमध्ये महेशच्या हत्येशी संबंधित काही गोष्टी पोलिसांना सापडल्या. याआधारे दोघांना अटक करण्यात आली असून त्यांची चौकशी सुरू आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"