हृदयद्रावक! "मी तुझ्या पतीला देवाकड पाठवलं", भारतीय जवानाची हत्या करून आरोपीचा पत्नीला मेसेज
By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2023 09:52 PM2023-09-09T21:52:46+5:302023-09-09T21:53:09+5:30
हरयाणातील अंबाला येथे भारतीय जवानाची हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली.
कानपूर : हरयाणातील अंबाला येथे भारतीय जवानाची हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली. पवन या जवानाच्या हत्येनंतर जवानाचे पार्थिव उत्तर प्रदेशातील कानपूर येथे त्याच्या मूळ गावी आणण्यात आले. कानपूर जिल्ह्यातील कैलाई या मूळ गावी शनिवारी पार्थिव दाखल झाले. जवानाच्या अंतिम दर्शनासाठी संपूर्ण गाव जमले होते. आपल्या एकुलत्या एक मुलाच्या मृत्यूने वडिलांनी एकच टाहो फोडला. पतीच्या पार्थिवासोबत सासरच्या घरी पोहचलेली पत्नी रागिणी कुटुंबीयांना भेटताच बेशुद्ध पडली. माझ्या पतीच्या मारेकऱ्यांना फाशी द्या, असे ती सातत्याने म्हणत होती.
दरम्यान, कुमाऊ रेजिमेंटचे जवान कानपूर कॅन्ट येथून जवानाला अखेरची सलामी देण्यासाठी दाखल झाले. अंत्यसंस्कार करण्याऐवजी समाधी बांधण्यासाठी जमिनीची मागणी ग्रामस्थांनी केली. प्रशासनाने ज्या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्याची तयारी केली होती, त्या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यास ग्रामस्थांनी नकार दिला आहे. मग अधिकाऱ्यांच्या मध्यस्थीनंतर विषय मार्गी लागला.
एका मेसेजने खळबळ
उत्तर प्रदेशातील कानपूर येथील रहिवासी असलेले जवान पवन यांचा मृतदेह अंबाला येथे रेल्वे रुळावर आढळून आला. त्यांची हत्या झाली असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. यामागचे कारण म्हणजे त्यांच्या पत्नीला व्हॉट्सॲपवर आलेला मेसेज. "मी तुझ्या पतीला देवाकडे पाठवले आहे, पाकिस्तान जिंदाबाद", अशा आशयाचा मेसेज जवानाच्या पत्नीला अज्ञाताने केला.
भारतीय जवानाची हत्या
खरं तर अंबाला येथे सैन्याच्या ४० एडी एसआर युनिटमध्ये ३ वर्षांपासून तैनात असलेले जवान पवन त्याची पत्नी आणि दोन मुलींसोबत राहत होते. कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी संध्याकाळी पवन शंकर मंदिरात जात असल्याचे सांगून घरातून निघाले. यानंतर ते परतलेच नाहीत. रात्री उशिरापर्यंत पत्नीने त्यांच्याशी फोनवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र फोन बंद असल्याचे आढळले. अखेर पवन यांच्या मोबाईलवरूनच व्हॉट्सॲपवर मेसेज आल्याने एकच खळबळ माजली. पोलिसांनी याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.