राज्यसभेत भाजपाला मदत करणाऱ्या जुन्या मित्राला धक्का, पण NDAचं बळ वाढणार, असं आहे गणित
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2024 05:05 PM2024-08-29T17:05:20+5:302024-08-29T17:05:29+5:30
NDA In Rajya Sabha: राज्यसभेच्या १२ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपा आणि एनडीएचे ११ खासदार निवडून आल्याने एनडीए राज्यसभेत बहुमताजवळ पोहोचली आहे. दरम्यान, आता एनडीएचं बळ वाढवणारी आणखी एक बातमी समोर आली आहे.
राज्यसभेच्या १२ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपा आणि एनडीएचे ११ खासदार निवडून आल्याने एनडीए राज्यसभेत बहुमताजवळ पोहोचली आहे. तत्पूर्वी राज्यसभेत महत्त्वाची विधेयकं पारित करण्यासाठी भाजपाला एनडीएच्या बाहेरील मित्रपक्षांवर अवलंबून राहावं लागत होतं. दरम्यान, आता एनडीएचं बळ वाढवणारी आणखी एक बातमी समोर आली आहे. राज्यसभेत भाजपाला वारंवार मदत करणाऱ्या वायएसआर काँग्रेसमधील दोन खासदारांनी आपल्या राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. तसेच ते चंद्राबाबू नायडू यांच्या तेलुगू देसम पक्षात प्रवेश करणार असल्याची शक्यता आहेत. त्यामुळे भाजपाचा जुना मित्र असलेल्या वायएसआर काँग्रेसला धक्का बसला आहे. मात्र या दोन जागांवर तेलुगू देसमचे दोन खासदार निवडून येण्याची शक्यता असल्याने आणि तेलुगू देसम एनडीएमधील प्रमुख पक्ष असल्याने राज्यसभेत तेलुगू देसमचं बळ वाढणार आहे.
आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांचा पक्ष असलेल्या वायएसआर काँग्रेस पक्षाचे दोन खासदार मोपीदेवी व्यंकटरमण आणि बेदा मस्तान राव यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. तसेच त्यांचा राजीनामा राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी स्वीकारला आहे. व्यंकटरमण यांचा कार्यकाळ जून २०२६ तर राव यांचा कार्यकाळ जून २०२८ पर्यंत होता. आंध्र प्रदेश विधानसभेतील गणित पाहता या दोन्ही जागांवर तेलुगू देसमचे खासदार निवडून येण्याची शक्यता आहे.
दरम्यान, नुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडणुकीत भाजपाने दणदणीत विजय मिळवला होता. तसेच या विजयामुळे राज्यसभेमध्ये एनडीए बहुमतापर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे अनेक महत्त्वाची विधेयके पारित करून घेणे एनडीएला सोपे जाणार आहे.