VIDEO: विमानतळावर वृद्धाला हार्ट ॲटॅक; डॉक्टर तरुणीने CPR देऊन वाचवले प्राण, कौतुकाचा वर्षाव!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2024 12:21 PM2024-07-18T12:21:44+5:302024-07-18T12:22:27+5:30
डॉक्टर तरुणीने दिलेल्या सीपीआरचा सकारात्मक परिणाम झाला आणि काही वेळाने हार्ट ॲटॅक आलेल्या वृद्धाला शुद्ध आली.
नवी दिल्ली : नवी दिल्ली येथील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका वृद्ध व्यक्तीला हार्ट ॲटॅक आल्यानंतर तिथं असणाऱ्या डॉक्टर तरुणीने सीपीआर देत त्याचे प्राण वाचवल्याची घटना समोर आली आहे. Rishi Bagree नावाच्या व्यक्तीने सोशल मीडियावर हा व्हिडिओ शेअर केल्यानंतर डॉक्टर तरुणीवर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.
व्हायरल व्हिडिओनुसार, इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील टर्मिनल-२ इथं एका ६० वर्षीय व्यक्तीला हार्ट ॲटॅक येऊन ती व्यक्तीच जागीच कोसळली. या वृद्धाची अवस्था पाहून आजूबाजूचे नागरिक गोंधळले. मात्र तिथं उपस्थित असणाऱ्या डॉक्टर तरुणीच्या हा प्रकार लक्षात येताच तिने ताबडतोब सदर व्यक्तीला सीपीआर देण्यास सुरुवात केली. तसंच विमानतळावरील कर्मचाऱ्यांना मदतीसाठी आवाज दिला. डॉक्टर तरुणीने दिलेल्या सीपीआरचा सकारात्मक परिणाम झाला आणि काही वेळाने हार्ट ॲटॅक आलेल्या वृद्धाला शुद्ध आली.
दरम्यान, कामाच्या घाईगडबडीत अनेकदा अशा घटनांकडे दुर्लक्ष करून लोक पुढे जातात. मात्र नवी दिल्ली येथील विमानतळावर डॉक्टर तरुणीने प्रसंगावधान दाखवत एका व्यक्तीचे प्राण वाचवल्याने तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
Today at T2 Delhi Airport, a gentleman in his late 60s had a heart attack in the food court area.
— Rishi Bagree (@rishibagree) July 17, 2024
This lady Doctor revived him in 5 mins.
Super proud of Indian doctors.
Please share this so that she can be acknowledged. pic.twitter.com/pLXBMbWIV4
"या तरुणीने अक्षरश: यमराजकडून वृद्धाचे प्राण हिसकावून आणले आहेत. तिचा मला अभिमान वाटतो," अशी प्रतिक्रिया 'एक्स'वरील या व्हिडिओखाली एका यूजरने दिली आहे. तसंच दुसऱ्या एका यूजरने म्हटलं आहे की, "संकटाच्या स्थितीत लोक मदत करण्यासाठी पुढे येतात, ही अत्यंत समाधानाची बाब आहे. आपल्या संस्कृतीला सलाम आणि डॉक्टर तरुणीला धन्यवाद."