केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदवार्ता, दोन वर्षांचा बोनस मिळणार
By admin | Published: August 30, 2016 05:33 PM2016-08-30T17:33:14+5:302016-08-30T17:33:14+5:30
केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोदी सरकारनं मोठं गिफ्ट देऊन खूश केलं आहे.
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 30 - केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोदी सरकारनं मोठं गिफ्ट देऊन खूश केलं आहे. गेल्या दोन वर्षांचा थकीत असलेला बोनस देण्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केली आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयाचा फायदा सुमारे 33 लाख कर्मचाऱ्यांना होणार आहे.
त्यामुळे 2014-15 आणि 2015-16 असा दोन वर्षांपासून थकित असलेला बोनस कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. हा बोनस सातव्या वेतन आयोगांतर्गत देण्यात येणार आहे. बिगरशेती कर्मचाऱ्यांचं किमान दैनिक वेतन 240 रुपयांवरून 350 रुपये करण्याचा ऐतिहासिक निर्णय मोदी सरकारनं घेतला आहे.
मजुरांच्या या वेतनात 110 रुपयांची घसघशीत वाढ करण्यात आली आहे. मात्र या वेतनवाढीवर ट्रेड युनियननं नाराजी व्यक्त करून संपाचा इशारा दिला आहे. सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या आणि बँकांनाही योग्य भरपाई दिली गेली पाहिजे, अशी मागणी ट्रेड युनियननं केली आहे.