आनंद गिरीने महंत नरेंद्र गिरी यांना आत्महत्येस प्रवृत्त केले; CBIच्या आरोपपत्रात खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2021 10:49 AM2021-11-21T10:49:24+5:302021-11-21T10:49:36+5:30
2008 पासून महंत नरेंद्र गिरी आणि आनंद गिरी यांच्यात मतेभेद सुरू झाले होते.
प्रयागराज: आखाडा परिषदेचे माजी अध्यक्ष दिवंगत महंत नरेंद्र गिरी यांच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) जिल्हा न्यायालयात आरोपी आनंद गिरीसह 3 जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे. सीबीआयने आपल्या तपासात त्याच तथ्यांवर भर दिला आहे, ज्यावर यूपी पोलिसांनी सुरुवातीच्या तपासात सांगितले होते. महंत नरेंद्र गिरी यांच्या मृत्यूला सीबीआयने आत्महत्या मानले आहे. त्याचबरोबर आनंद गिरी, आध्या तिवारी आणि संदीप तिवारी यांच्यावर 306, 120बी कलम लावण्यात आले आहे.
गंगा सेनेच्या निर्मितीनंतर अंतर वाढले
आनंद गिरी यांनी 2008 मध्ये गंगा सेनेची स्थापना केल्याचे सीबीआयने आपल्या आरोपपत्रात नमूद केले आहे. कुंभमेळ्यात स्वतंत्र कॅम्प लावण्यात आला होता. येथूनच महंत नरेंद्र गिरी आणि आनंद गिरी यांच्यातील अंतर वाढू लागले होते. महंत नरेंद्र गिरी यांनीही गंगा सेनेबाबत आक्षेप व्यक्त केला होता. मठात राहत असताना आनंद गिरी यांनी परवानगी घेतली नसल्याचे त्यांनी सांगितले होते.
पेट्रोल पंप उघडण्याच्या वृत्ताचे खंडन
आनंद गिरी यांना अल्लापूर येथील बागंब्री गड्डी मठाच्या 744 चौरस मीटर जागेवर पेट्रोल पंप सुरू करण्याबाबत विचारणा केली असता, आनंदने पेट्रोल पंप उघडण्याच्या दाव्यांचे खंडन केले आहे. पण, सीबीआयच्या तपासात आनंद गिरीने 15 डिसेंबर 2018 रोजी हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन वाराणसीकडे अर्ज केल्याचे समोर आले आहे.
जमीन विकल्याचे पुरावे नाही
महंत नरेंद्र यांना मठाची जमीन गिरी जिल्ह्यातील एका प्रसिद्ध डॉक्टरला दीड कोटींना विकायची होती, असा आरोप आनंद गिरीने केला. मात्र सीबीआयच्या पथकाने या प्रकरणाचा तपास केला असता आनंद गिरीचे आरोप खोटे असल्याचे निष्पन्न झाले. यासंदर्भात सीबीआयला कोणतेही पुरावे मिळाले नाहीत.