Anand Mahindra: आनंद महिंद्रांनी पाळला दिलेला शब्द, सुवर्णपदक विजेत्या शूटरला दिली खास भेट
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2022 11:51 AM2022-01-20T11:51:56+5:302022-01-20T11:52:52+5:30
महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी टोकियो पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेती अवनी लेखरा हिला कस्टम XUV700 भेट दिली आहे.
नवी दिल्ली: महिंद्रा समुहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी अनेकदा भारतासाठी विविध स्पर्धेमध्ये पदके जिंकणाऱ्या खेळाडूंना आपल्या महिंद्रा कंपनीची गाडी भेट म्हणून दिली आहे. आता पुन्हा एकदा त्यांनी अशाच एका खेळाडूला खास बनवलेली गाडी भेट म्हणून दिली आहे. महिंद्रा कंपनीने गेल्या वर्षी झालेल्या टोकियो पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळवणाऱ्या अवनी लेखरा हिला खास कस्टम बिल्ट XUV700 गोल्ड एडिशन गाडी भेट दिली आहे.
या एक्सक्लुसिव्ह XUV700 मध्ये समोरच्या दोन्ही सीट कस्टम मेड आहेत. या गाडीत दिव्यांग व्यक्ती अगदी सहजपणे बसू शकतो आणि उतरू शकतो. ऑगस्ट 2021 मध्ये महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी लेखरा हिला एक खास एसयूव्ही देण्याचे वचन दिले होते, ते वचन आता त्यांनी पूर्ण केले आहे. अवनीने महिलांच्या 10 मीटर एअर स्टँडिंग SH1 मध्ये सुवर्णपदक जिंकले होते. नेमबाजी पॅरा स्पोर्ट्समधील भारतासाठी हे पहिले सुवर्णपदक आहे. या सुवर्णपदकासोबतच अवनीने 249.6 मीटरचा नवा पॅरालिम्पिक विक्रमही प्रस्थापित केला आहे.
🙏🏽🙏🏽🙏🏽 https://t.co/WgHyREpiYo
— anand mahindra (@anandmahindra) January 19, 2022
गाडीत खास कस्टम मेड सीट
या स्पेशल महिंद्रा XUV700 च्या पुढील बाजूच्या सीट्स पुढे आणि मागे सरकण्यासोबतच बाहेर येऊ शकतात. यामुळे दिव्यांग व्यक्तीला त्यात बसणे अगदी सोपे होते. सीटवर बसल्यानंतर रिमोटच्या मदतीने सीट आत नेता येते. दिव्यांग व्यक्तींना जास्त उंचीच्या अवजड वाहनांमध्ये बसण्यास त्रास होतो, अशा परिस्थितीत या विशेष आसनांवर बसणे सोपे जाते.
यापूर्वीही खेळाडूंना दिली गोल्ड एडिशन
आनंद महिंद्रा यांनी याआधी नीरज चोप्रा आणि सुमित अंतिल यांनाही XUV700 ची गोल्ड एडिशन दिली आहे. तिन्ही कार महिंद्राच्या डिझाइन ऑफिसचे कार्यकारी उपाध्यक्ष आणि मुख्य डिझाइन अधिकारी प्रताप बोस यांनी डिझाइन केल्या आहेत. अवनीला मिळालेली एक्सयूव्ही मिडनाईट ब्लॅक शेडमध्ये आली आहे, ज्याला आत आणि बाहेर खास गोल्ड अॅक्सेंट देण्यात आले आहे.
XUV700 ची किंमत 12.95 लाख
Mahindra XUV700 ही कंपनीची सर्वात महागडी SUV आहे आणि भारतात तिची एक्स-शोरूम किंमत 12.95 लाख रुपयांपासून सुरू होऊन आणि 23.79 लाख रुपयांपर्यंत जाते. कंपनीने या एसयूव्हीला मजबूत सुरक्षा वैशिष्ट्ये दिली आहेत आणि ती दिसायला एक मजबूत एसयूव्ही आहे. कंपनीने यात दोन इंजिन पर्याय दिले आहेत, ज्यात 2.0-लीटर GDI टर्बो पेट्रोल आणि 2.2-लीटर mHawk डिझेल इंजिन समाविष्ट आहे. कंपनीने या दोन्ही इंजिनसह 6-स्पीड मॅन्युअल किंवा 6-स्पीड ऑटोमॅटिक टॉर्क कन्व्हर्टर ट्रान्समिशन दिले आहे.