Anand Mahindra: 'इगो'चे 'टॉवर' पाडण्यासाठी अशाच स्फोटकांची गरज भासते; आनंद महिंद्रांचे अनोखे 'मंडे मोटिवेशन'!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2022 01:03 PM2022-08-29T13:03:13+5:302022-08-29T13:04:42+5:30
देशातील सुप्रसिद्ध उद्योगपती आणि महिंद्रा अँड महिंद्रा ग्रूपचे मालक आनंद महिंद्रा सोशल मीडियात चांगलेच सक्रिय असतात.
मुंबई-
देशातील सुप्रसिद्ध उद्योगपती आणि महिंद्रा अँड महिंद्रा ग्रूपचे मालक आनंद महिंद्रा सोशल मीडियात चांगलेच सक्रिय असतात. समाजातील विविध घटनांची ते आवर्जुन दखल घेत असतात तसंच गरजूंना मदतही करतात. विविध प्रश्नांवर तोडगा काढण्याचा त्यांचा नेहमी प्रयत्न असतो. तसंच युवापीढीच्या नाविण्यपूर्ण कामांची ते दखल घेतात. आज पुन्हा एकदा आनंद महिंद्रांनी केलेल्या ट्विटची चर्चा आहे.
नोएडामध्ये काल अनधिकृत ट्विन टॉवर सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर स्फोटकं लावून पाडण्यात आले. यासाठी इमारतीत मोठ्या प्रमाणात स्फोटकं लावण्यात आली होती आणि संपूर्ण तयारीनिशी नियोजनबद्ध पद्धतीनं टॉवर पाडण्यात आले. याचे व्हिडिओ देखील सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत. अवघ्या १० सेकंदात दोन गगनचुंबी इमारती जमीनदोस्त झाल्या आणि उरला तो फक्त ढिगारा. आनंद महिंद्रांनी याच घटनेची दखल घेत अनोख्या पद्धतीनं त्यावर भाष्य केलं आहे.
Why am I using the demolition of the Noida towers for #MondayMotivation ? Because it reminds me of the dangers of letting our egos get too tall. Sometimes we need explosives to demolish the excess ego. pic.twitter.com/qSMl2qSera
— anand mahindra (@anandmahindra) August 29, 2022
ट्विन टॉवर पाडकामाला आनंद महिंद्रांनी 'मंडे मोटिवेशन'ची उपमा दिली आहे. "ट्विन टॉवर पाडकामाचा हा व्हिडिओ मी मुद्दाम मंडे मोटिवेशन म्हणून वापरत आहे. कारण यातून मला आपल्यातील अहंकाराचा (इगो) टॉवर निर्माण होण्याच्या धोक्याची आठवण करुन देत राहतील आणि काहीवेळा आपल्याला अतिरिक्त अहंकार नष्ट करण्यासाठी अशाच स्फोटकांची आवश्यकता असते", असं आनंद महिंद्रा यांनी ट्विटमध्ये नमूद केलं आहे.
भ्रष्टाचाराचे शिखर कोसळले
नोएडातील सेक्टर ९३ एमधील सुपरटेकचे ट्विन टॉवर भ्रष्टाचारामुळे अनेक वर्षे वादात सापडले होते. अखेर न्यायालयाच्या निर्देशांनंतर ते पाडण्यात आले. मात्र यामुळे ज्या ग्राहकांनी येथे आपल्या स्वप्नातील घर घेण्याचे स्वप्न पाहिले त्यांच्या स्वप्नांचा यावेळी धुरळा उडाला, ज्यामुळे काही मिनिटे डोळ्यांसमोर फक्त धुळीचे साम्राज्य पसरले होते. ट्विन टॉवर उद्ध्वस्त करण्यासाठी ३७०० किलोपेक्षा अधिक स्फोटकांचा वापर करण्यात आला. यामुळे बाजूच्या इमारतींच्या काचाही काहीकाळ थरथरल्या.