आनंदीबेन पटेल गमावणार गुजरातचे मुख्यमंत्रीपद?
By admin | Published: May 16, 2016 05:10 PM2016-05-16T17:10:52+5:302016-05-16T17:31:40+5:30
गुजरातमध्ये होणाऱ्या आगामी निवडणूकीपुर्वी भाजपा आनंदीबेन पटेल यांची गुजरातच्या मुख्यमंत्री पदावरुन हकालपट्टी करुन त्यांच्या जागी नवा चेहरा घेऊन येणार असल्याच्या बातम्या आहेत.
ऑनलाइन लोकमत
गांधीनगर, दि. १६ - आगामी गुजरात विधानसभा निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पक्षातील ‘आयर्न लेडी’ म्हणून ओळखल्या जाणार्या आनंदीबेन पटेल यांची गुजरातच्या मुख्यमंत्री पदावरुन हकालपट्टी होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. पुढील वर्षी गुजरातमध्ये विधानसभा निवडणूक पार पडणार असून भाजपाला या राज्यातील सत्ता गमावणे परवणार नाही. त्यामुळे आनंदीबेन पटेल यांना हटवून त्यांच्या जागी नवा चेहरा आणण्याचा भाजपाचा विचार आहे. नितीन पटेल हे गुजरातचे नवे मुख्यमंत्री बनू शकतात.
गुजरात भाजपामध्ये सुरू असलेल्या अंतर्गत कलहामध्ये भाजपा नेतृत्व चिंतीत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, पटेल यांना गुजरातच्या मुख्यमंत्रीपदावरून हटवून त्यांना पंजाबचे राज्यपाल बनवण्यात येणार आहे. तसेच मुख्यमंत्रीपदासाठी भाजपाचे ज्येष्ठ नेते नितीन पटेल यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुजरातमध्ये पटेल समुदायाने आरक्षणासाठी केलेल्या आंदोलनानंतरच भाजपाचे मुख्य नेतृत्व राज्याचा मुख्यमंत्री बदलण्याचा विचार करत होते.
दरम्यान यापूर्वीच आनंदीबेन पटेल यांनी आगामी निवडणूकीत आपण मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत नसल्याचे स्पष्ट केले होते. २२ मे २०१४ रोजी नरेंद्र मोदीं विरोधकांना धूळ चारुन पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी आनंदीबेन पटेल यांची नेमणूक झाली.