आनंदीबेन पटेल देणार गुजरात मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा
By Admin | Published: August 1, 2016 05:03 PM2016-08-01T17:03:34+5:302016-08-01T19:01:50+5:30
गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल राजीनामा देणार आहेत. आपल्याला जबाबदारीतून मुक्त करण्याची विनंती आनंदीबेन पटेल पक्षश्रेष्ठींकडे करणार आहेत
ऑनलाइन लोकमत -
अहमदाबाद, दि. 01 - गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल राजीनामा देणार आहेत. आपल्याला जबाबदारीतून मुक्त करण्याची विनंती आनंदीबेन पटेल पक्षश्रेष्ठींकडे करणार आहेत. विशेष म्हणजे आनंदीबेन पटेल यांनी फेसबुकवर यासंबंधी पोस्ट टाकली आहे. आपल्या वयाची 75 वर्ष पुर्ण झाली आहेत, आपण आता निवृत्त होऊ इच्छितो असं आनंदीबेन पटेल यांनी म्हटलं आहे. राजीनामा देणार असं 2 महिन्यांपूर्वी कळवलं होतं असंही आनंदीबेन पटेल यांनी सांगितलं आहे.
नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर आनंदीबेन यांच्याकडे गुजरातची धुरा सोपवण्यात आली होती. मात्र, पटेल समाजाचं आरक्षणासाठीचं आंदोलन आणि नुकताच झालेला उना येथील दलितांवरील हल्ला यामुळे भाजपाची प्रतिमा गुजरातमध्ये मलीन झाल्याची टीका होत होती. भाजपाची गुजरातवरील पकड ढिली झाली तर दशकापेक्षा जास्त काळ ताब्यात असलेलं राज्य पुढील निवडणुकांमध्ये गमावण्याचा धोका आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर पटेल यांच्या राजीनाम्याकडे पाहण्यात येत आहे.
#WATCH Guj CM Anandiben Patel says she will soon be 75 years of age, offers to resign from CM post citing the same.https://t.co/c00za19tW3
— ANI (@ANI_news) August 1, 2016
दरम्यान, भाजपा अध्यक्ष अमित शाह यांनी आनंदीबेन यांचा राजीनामा देऊ इच्छिणारे पत्र मिळाले असल्याचे सांगितले असून, भाजपाचं संसदीय मंडळ लवकरच निर्णय घेईल असे स्पष्ट केले आहे. जानेवारीमध्ये व्हायब्रंट गुजरात हे बिझिनेस समिट असून नवीन मुख्यमंत्र्याला त्यासाठी तयारी करण्यास पुरेसा वेळ मिळेल असेही एक मत आहे.
तर, आपण नोव्हेंबरमध्ये वयाची पंचाहत्तरी पार करत असल्यामुळे मुख्यमंत्रीपदावरून पायउतार होणे उचीत असल्याचे आनंदीबेन यांनी सांगितल्याचे एका वृत्तसंस्थेने म्हटले आहे.