आनंदीबेन पटेल यांच्या कन्येला स्वस्तात जमीन
By admin | Published: February 6, 2016 02:57 AM2016-02-06T02:57:22+5:302016-02-06T02:57:22+5:30
गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांची कन्या अनार जयेश पटेल (४५) यांच्या एका ‘बिझनेस पार्टनर’च्या वाईल्डवूड रिसॉर्ट अॅण्ड रियाल्टीस या कंपनीला राज्यातील गीर अभयारण्याला लागून असलेली
शीलेश शर्मा, नवी दिल्ली
गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांची कन्या अनार जयेश पटेल (४५) यांच्या एका ‘बिझनेस पार्टनर’च्या वाईल्डवूड रिसॉर्ट अॅण्ड रियाल्टीस या कंपनीला राज्यातील गीर अभयारण्याला लागून असलेली २५० एकर सरकारी जमीन अवघ्या १५ रुपये प्रति वर्गमीटर दराने विकण्यात आली आहे. कोट्यवधींची सरकारी जमीन अशी कवडीमोल भावात आपली कन्या आणि तिच्या व्यावसायिक भागीदारांना विकल्याबद्दल आनंदीबेन यांनी मुख्यमंत्रिपदाचा तात्काळ राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.
या संपूर्ण जमीन सौद्याची सर्वोच्च न्यायालयाच्या निगराणीखाली विशेष तपास पथकामार्फत (एसआयटी) चौकशी करण्यात आली पाहिजे. कारण दुसऱ्या चौकशी संस्थेकडून निष्पक्ष चौकशीची अपेक्षा केली जाऊ शकत नाही, असे काँग्रेसचे प्रवक्ते आनंद शर्मा म्हणाले. ज्यावेळी ही कृषी जमीन अनार पटेल यांना देण्यात आली त्यावेळी नरेंद्र मोदी हे राज्याचे मुख्यमंत्री होते. मोदींच्या अध्यक्षतेत झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीतच ‘लँड यूज’ बदलण्यात आले. त्यामुळे कृषी जमिनीचा उपयोग अन्य व्यावसायिक उद्देशासाठी करण्याची परवानगी देण्यात आली, असा आरोप शर्मा यांनी केला. ते पत्रकारांशी बोलत होते.
अनार पटेल यांना जमीन देण्यात आल्याची आणि जमिनीचा लँड यूज बदलल्याची माहिती मोदींना होती काय? ज्यांना ही जमीन दिली जात आहे, त्यांचे आनंदीबेन पटेल आणि त्यांची कन्या अनार पटेल यांच्यासोबत व्यावसायिक संबंध आहेत याची मोदींना कल्पना होती काय, असा सवाल करून आज पंतप्रधान असलेले मोदी यांनी याबाबत स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी शर्मा यांनी केली.
शर्मा पुढे म्हणाले, ‘ही जमीन वाटप करण्यात आली त्यावेळी आनंदीबेन गुजरातच्या महसूलमंत्री होत्या. आज हे खाते त्यांच्याचकडे आहे. जो पंतप्रधान भ्रष्टाचार अजिबात सहन करणार नाही असे सांगतो, न खाऊंगा, न खाने दुंगा असे म्हणतो त्याच्याच अध्यक्षतेखालील बैठकीत कोट्यवधी रुपयांची जमीन अशी कवडीमोल दराने विकली जाते. तिचा भूउपयोग बदलला जातो. हे सर्व आनंदीबेन यांच्या कन्येच्या फायद्यासाठी केले असेल तर मोदींनी उत्तर दिलेच पाहिजे. कारण ते त्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री होते. आनंदीबेन पटेल यांनी आपली कन्या व तिच्या व्यावसायिक भागीदारांना लाभ पोहोचविण्यासाठी कोट्यवधींची जमीन कवडीमोल भावात विकली.’
वाईल्डवूड कंपनीला ४२७ एकर सरकारी जमीन देण्यात आली. त्यापैकी २५० एकर जमीन केवळ १५ रुपये वर्गमीटर भावाने देण्यात आली. हा सौदा २०१० मध्ये झाला होता. त्यावेळी गीर अभयारण्याला लागून असलेल्या या २५० एकर जमिनीची बाजारभाव किंमत १२५ कोटी रुपये होती. पण ही जमीन वाईल्डवूडला केवळ दीड कोटी रुपयांत देण्यात आली. वाईल्डवूडच्या प्रवर्तकांना रिसॉर्ट बांधण्याचा कसलाही अनुभव नव्हता. पण केवळ अनार पटेलशी व्यावसायिक संबंध असल्यामुळे ही जमीन देण्यात आली.
या जमिनीचे सर्व व्यवहार कागदोपत्री असल्याचे अनार पटेल, शाह आणि सेठ यांनी स्पष्ट केले आहे. जी २५० एकर जमीन वाईल्डवूडला देण्यात आली ती जमीन अमरेली जिल्ह्यातील गीर येथे असलेल्या प्रसिद्ध गीर अभयारण्याला लागून आहे. त्यामुळे तिचे व्यावसायिक मूल्यही फार मोठे आहे. शिवाय वाईल्डवूडला आणखी १७२ एकर कृषी जमीन विकत घेण्याची आणि ही जमीन अकृषक जमिनीत रूपांतरित करण्याची परवानगी देण्यात आली होती.या २५० एकर जागेवर पर्यटक रिसॉर्ट बांधण्याची योजना होती, पण ती फलद्रूप झाली नाही, असे वाईल्डवूडच्या मूळ प्रवर्तकांनी सांगितले. पर्यटक रिसॉर्ट बांधण्याला मनाई हुकूम नाही आणि त्यासाठी सर्व प्रकारची मंजुरीही मिळविण्यात आली आहे. पण अद्याप रिसॉर्ट मात्र बांधण्यात आलेले नाही, असे कंपनीच्या विद्यमान प्रवर्तकांचे म्हणणे आहे.या कंपनीत संजय धनक व दक्षेस शाह हे दोन भागीदार होते. त्यांच्या कंपनीने जवळपासची आणखी १७२ एकर जमीनही आपल्या नावे केली. नंतर ही जमीन शाह व अमोल श्रीपाल यांच्या नावावर करण्यात आली. कारण धनक यांनी आपली भागीदारी श्रीपाल यांना दिली होती. या जमिनीची मालकी अनेकदा बदलण्यात आली. त्यानंतर दक्षेस शाह व अनार पटेल यांनी वेगवेगळ्या कंपन्या स्थापन करून या ४२७ एकर जमिनीवर कब्जा केला. शाह आणि अनार पटेल हे दोघे अनेक कंपन्यांमध्ये भागीदार आहेत.