आनंदीबेन लढवणार नाहीत गुजरात विधानसभा निवडणूक, पत्र लिहून अमित शाहांना दिली माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2017 06:21 PM2017-10-09T18:21:00+5:302017-10-09T18:21:20+5:30
गुजरातच्या माजी मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल आगामी विधानसभा निवडणूक लढवणार नाही, असं त्यांनी पत्र लिहून अमित शाहांना कळवलं आहे.
अहमदाबाद- गुजरातच्या माजी मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल आगामी विधानसभा निवडणूक लढवणार नाही, असं त्यांनी पत्र लिहून अमित शाहांना कळवलं आहे. भाजपाच्या 75 वर्षांनंतर निवडणूक न लढवण्याच्या धोरणाचा हवाला देत त्यांनी विधानसभा लढवण्यास नकार दिला आहे.
आनंदीबेन यांनी पत्र लिहून याबाबत अमित शाहांना माहिती दिली आहे. त्या म्हणाल्या, मी 1998पासून आमदार असून, पक्षानं दिलेली प्रत्येक जबाबदारी यशस्वीरीत्या सांभाळली आहे. 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर आनंदीबेन यांच्याकडे गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. परंतु दोन वर्षांच्या आतच त्यांना राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर विजय रुपानी यांना भाजपानं गुजरातचे मुख्यमंत्री बनवले.
रुपानी हे भाजपाध्यक्ष अमित शाहांच्या जवळचे समजले जातात. डिसेंबरमध्ये होणा-या विधानसभा निवडणुकीआधीच आनंदीबेन सक्रिय झाल्या होत्या. तसेच गुजरातमध्ये त्याच भाजपाचा चेहरा असतील, अशी अटकळही बांधली जात होती. आता त्यांनी स्वतः पत्र लिहून मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत नसल्याचं जाहीर केलं आहे.
Anandiben Patel writes to BJP Pres Amit Shah, stating that in place of her new people must be given a chance to contest 2017 Gujarat polls. pic.twitter.com/TB7doOG12A
— ANI (@ANI) October 9, 2017
शाह यांना पत्र लिहून आनंदीबेन म्हणाल्या, माझ्या घाटलोडिया मतदारसंघातून इतर कोणत्या तरी भाजपाच्या तरुण कार्यकर्त्याला तिकीट द्यावी, भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी तरुणांना संधी पाहिजे, त्यांना मार्गदर्शन दिलं पाहिजे, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.