'अनंत कुमार हेगडे यांची जीभ कापणा-याला 1 कोटींचं बक्षीस'

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2017 08:06 PM2017-12-26T20:06:37+5:302017-12-26T20:08:53+5:30

केंद्रीय मंत्री अनंत कुमार हेगडे यांची जीभ कापून आणणा-याला एक कोटींचं बक्षीस दिलं जाईल असं वादग्रस्त वक्तव्य कर्नाटकमधील माजी जिल्हा पंचायत सदस्य गुरुशांत पट्टेदार यांनी केलं आहे

'Anant Kumar Hegde's tongue-in-one prize for 1 million' | 'अनंत कुमार हेगडे यांची जीभ कापणा-याला 1 कोटींचं बक्षीस'

'अनंत कुमार हेगडे यांची जीभ कापणा-याला 1 कोटींचं बक्षीस'

Next
ठळक मुद्दे'केंद्रीय मंत्री अनंत कुमार हेगडे यांची जीभ कापून आणणा-याला एक कोटींचं बक्षीस दिलं जाईल'कर्नाटकमधील माजी जिल्हा पंचायत सदस्य गुरुशांत पट्टेदार यांचं वादग्रस्त वक्तव्यहेगडे यांच्या या वक्तव्यामुळे दलित, मुस्लिम, मागासलेल्या आणि धर्मनिरपेक्ष लोकांची मनं दुखावल्याचा दावा

बंगळुरु - केंद्रीय मंत्री अनंत कुमार हेगडे यांची जीभ कापून आणणा-याला एक कोटींचं बक्षीस दिलं जाईल असं वादग्रस्त वक्तव्य कर्नाटकमधील माजी जिल्हा पंचायत सदस्य गुरुशांत पट्टेदार यांनी केलं आहे. ज्या लोकांना आपल्या अस्तित्वाबद्दल पूरेशी माहिती नसते, ते स्वत: ला धर्मनिरपेक्ष म्हणवतात या वक्तव्याचा निषेध करताना त्यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलं. अनंत कुमार हेगडे यांच्या या वक्तव्यामुळे दलित, मुस्लिम, मागासलेल्या आणि धर्मनिरपेक्ष लोकांची मनं दुखावल्याचा दावा गुरुशांत पट्टेदार यांनी केला आहे. 

'अनंत कुमार हेगडे यांच्या वक्तव्याचा निषेध करत मी घोषणा करत आहे की, त्यांची जीभ कापणा-या 1 कोटींच रोख बक्षीस दिलं जाईल', असं गुरुशांत पट्टेदार म्हणाले आहेत. आपण ज्येष्ठ दलित नेता असल्याचं ते सांगत आहेत. एमआयमसोबत हातमिळवणी केलेल्या गुरुशांत पट्टेदार यांनी आपण आपल्या इच्छेने ही घोषणा करत असल्याचं सांगितलं आहे. 'एका महिन्याच्या आत म्हणजेच 26 जानेवारीपर्यंत जो कोणी हेगडेंची जीभ छाटून आणेल त्याला 1 कोटींचं बक्षीस देण्यास मी तयार आहे', असं ते म्हणाले. अनंत कुमार हेगडे यांनी राज्यघटनेचा अपमान केल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. 

काय बोलले होते अनंत कुमार हेगडे -  
आपला पक्ष भाजपा लवकरच राज्यघटना बदलणार आहे, ज्यामध्ये धर्मनिरपेक्ष असा उल्लेख आहे असं वक्तव्य अनंत कुमार हेगडे यांनी केलं आहे. कर्नाटकच्या कोप्पल जिल्ह्यातील कुकानूरमधील ब्राह्मण युवा परिषदेतच्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं. काही लोकांना स्वत:ला धर्मनिरपेक्ष म्हणवून घेण्याची लहर आली असल्याचं सांगत त्यांनी हे वक्तव्य केलं. 

अनंत कुमार हेगडे यांनी लोकांना अभिमानाने आपण मुस्लिम, ख्रिश्चन, लिंगायत, ब्राम्हण किंवा हिंदू आहोत असं सांगण्याचं आवाहन केलं आहे. 'अनेकांना ज्यांना आपल्या साध्या कुटुंबाची माहिती नसते, ते स्वत:ला धर्मनिरपेक्ष संबोधत असतात. त्यांची स्वत:ची काही ओळखच नसते. त्यांना आपल्या पुर्वजांची काहीच माहिती नसते, पण हेच लोक स्वत: ला बुद्धिजीवी म्हणवतात', असं ते म्हणाले आहेत. 

'काही लोकांचं म्हणणं आहे की, राज्यघटनेनं आपल्या धर्मनिरपेक्ष म्हणण्याचा अधिकार दिला आहे, आणि तो आपण स्विकारला पाहिजे. आम्ही राज्यघटनेचा आदर करु, पण याच राज्यघटनेत अनेकदा बदलही करण्यात आले आहेत, आणि भविष्यातही होतील. आम्ही राज्यघटना बदलण्यासाठी इथे आलो आहोत, आणि ती बदलणारच', असं अनंत कुमार हेगडे म्हणाले आहेत. 

कर्नाटक काँग्रेसने अनंत कुमार हेगडे यांच्या वक्तव्याचा निषेध केला असून भाजपा पक्ष त्यांच्या वक्तव्याशी सहमत आहे का अशी विचारणा केली आहे. 'अनंत कुमार हेगडे यांनी राज्यघटना वाचलेली नसावी. त्यांना संसदीय आणि राजकीय भाषेची जाण नाही. देशातील प्रत्येक नागरिक भारतीय आहे आणि प्रत्येक धर्माला समान हक्क आणि संधी आहे हे त्यांना माहित असावं', अशी टीका मुख्यमंत्री सिद्दरमय्या यांनी केली आहे. 

अनंत कुमार हेगडे पाच वेळा लोकसभा सदस्य म्हणून निवडून आले आहेत. ऑगस्ट महिन्यात झालेल्या केंद्रीय मंत्रीमंडळ फेरबदलात त्यांना स्थान देण्यात आलं होतं. ज्या राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत तिथे पक्षाचा प्रचार आणि वजन वाढण्याच्या हेतूने त्यांना संधी देण्यात आली होती. 

अनंत कुमार हेगडे यांनी वादग्रस्त वक्तव्य करण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी कौशल्य विकास आणि उद्योग मंत्रीपद दिल्यानंतर ते वादात आले होते. सिद्धरमय्या यांच्यासोबत गैरवर्तन केल्याबद्दल त्यांच्याविरोधात एफआयर नोंद करण्यात आला होता. तसंच डॉक्टराला कानाखाली मारतानाचं त्यांचं सीसीटीव्ही फुटेजही चांगलंच व्हायरल झालं होतं. खाली पडल्याने जखमी झालेल्या आपल्या आईकडे दुर्लक्ष करत असल्याच्या रागात त्यांनी डॉक्टरला मारहाण केली होती. 

नोव्हेंबरमध्ये त्यांनी कर्नाटक सरकारने आयोजित केलेल्या टीपू सुलतानच्या जयंती कार्यक्रमात सहभागी होण्यास नकार दिला होता. त्यावेळी त्यांनी टीपू सुलताना हा हिंदू विरोधी राजा असल्याने कार्यक्रमास उपस्थित राहण्यास नकार दिला होता.

Web Title: 'Anant Kumar Hegde's tongue-in-one prize for 1 million'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :BJPभाजपा