दहशतवाद्यांशी लढताना हिमाचलचे प्रवीण शर्मा शहीद; २ महिन्यांनी होणार होतं लग्न अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2024 12:23 PM2024-08-12T12:23:31+5:302024-08-12T12:29:46+5:30

Praveen Sharma : जम्मू-काश्मीरमधील अनंतनागमध्ये गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या ऑपरेशन रक्षकमध्ये सिरमौर जिल्ह्यातील सुपुत्र प्रवीण शर्मा शहीद झाले आहेत.

anantanag terror attack martyrd jawan himachal pradesh praveen sharma | दहशतवाद्यांशी लढताना हिमाचलचे प्रवीण शर्मा शहीद; २ महिन्यांनी होणार होतं लग्न अन्...

दहशतवाद्यांशी लढताना हिमाचलचे प्रवीण शर्मा शहीद; २ महिन्यांनी होणार होतं लग्न अन्...

भारत मातेचे रक्षण करताना भारतीय लष्कराच्या आणखी एका शूर जवानाने बलिदान दिले आहे. जम्मू-काश्मीरमधील अनंतनागमध्ये गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या ऑपरेशन रक्षकमध्ये सिरमौर जिल्ह्यातील सुपुत्र प्रवीण शर्मा शहीद झाले आहेत. प्रवीण शर्मा हे सिरमौर जिल्ह्यातील राजगढ उपविभागातील पालू गावचे रहिवासी होते. ते वन पॅरा स्पेशल फोर्समध्ये तैनात होते आणि फक्त २६ वर्षांचे होते. 

प्रवीण हे त्यांच्या आई-वडिलांचे एकुलते एक पुत्र होते आणि दोन महिन्यांनीच त्यांचं लग्न होणार असल्याची माहिती मिळत आहे. जिल्ह्यातील सिरमौरचे उपायुक्त सुमित खिमटा यांनी दिलेल्या माहितीनुसार, शहीद प्रवीण शर्मा यांचं पार्थिव सोमवारी सकाळी चंदीगडला पोहोचेल. चंदीगड येथून पार्थिव आणण्यासाठी प्रशासनाने रुग्णवाहिकेची व्यवस्था केली आहे. 

यासंदर्भात राजगडच्या एसडीएमलाही योग्य मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. सोमवारी शहीद जवानावर त्यांच्या मूळ गावी हब्बन येथे लष्करी सन्मानासह शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. प्रवीण शर्मा यांच्या हौतात्म्याने देशासह हिमाचल प्रदेशात शोककळा पसरली आहे. 

हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू, उपमुख्यमंत्री मुकेश अग्निहोत्री, उद्योगमंत्री हर्षवर्धन चौहान आणि विरोधी पक्षनेते जयराम ठाकूर यांनी शहीद प्रवीण शर्मा यांच्या कुटुंबाप्रती शोक व्यक्त केला आहे. यापूर्वी २४ जुलै रोजी श्रीनगरजवळ दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत गनर दिलावर खान हे शहीद झाले होते. ते हिमाचलमधील उना जिल्ह्यातील रहिवासी होते.

Web Title: anantanag terror attack martyrd jawan himachal pradesh praveen sharma

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.