जम्मू-काश्मीर: अनंतनाग चकमकीत देशाचे मोठे नुकसान, कर्नल-मेजर आणि डीएसपी शहीद
By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2023 06:51 PM2023-09-13T18:51:52+5:302023-09-13T18:54:02+5:30
2020 नंतर पहिल्यांदाच जम्मू-काश्मीरमध्ये उच्च पदावरील अधिकारी शहीद झाले आहेत.
Jammu-Kashmir: आज जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यात मोठी घटना घडली. दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत कर्नल, मेजर आणि डीएसपी पदावरील तीन अधिकारी शहीद झाले आहेत. मेजर आशिष धोनक आणि कर्नल मनप्रीत सिंग, डीएसपी हुमायून भट अशी या अधिकाऱ्यांची नावे आहेत. कर्नल मनप्रीत सिंग 19 राष्ट्रीय रायफल्समध्ये कमांडिंग ऑफिसर पदावर तैनात होते. 2020 नंतर जम्मू-काश्मीरमध्ये पहिल्यांदाच अधिकाऱ्यांना आपला जीव गमवावा लागला आहे.
Army colonel and major, deputy superintendent of JK Police killed in Anantnag gunfight: Officials
— Press Trust of India (@PTI_News) September 13, 2023
काश्मीर झोन पोलिसांनी सांगितले की, 12-13 सप्टेंबरच्या मध्यरात्री लष्कर आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी संयुक्त ऑपरेशन सुरू केले. बुधवारी सकाळी गडोले परिसरात लपलेले दहशतवादी आणि सुरक्षा दलात चकमक सुरू झाली. या गोळीबारात कर्नल मनप्रीत सिंग, मेजर आशिष धोनक आणि डिएसपी हुमायून भट शहीद झाले आहेत.
राजौरीमध्येही चकमक
दरम्यान, मंगळवारी दुपारपासून राजौरीतील नारला भागात दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरू आहे. या चकमकीत आतापर्यंत दोन दहशतवादी ठार झाले आहेत, तर एक जवान आणि एक स्निफर डॉग शहीद झाला. याशिवाय तीन पोलीस अधिकारीही जखमी झाले आहेत. 45 दिवसांत राजौरी आणि पुंछ भागात भारतीय लष्कराने आतापर्यंत 20 दहशतवाद्यांना ठार केले आहे. बहुतांश दहशतवादी पाकिस्तानी होते. या दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे आणि दारुगोळा जप्त करण्यात आला आहे.