...अन् भाजीवाली इंग्रजीत बोलू लागली; पीएच.डी. असूनही इंदूरमध्ये लावते हातगाडी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2020 10:44 PM2020-07-24T22:44:54+5:302020-07-24T22:46:25+5:30
व्हिडिओ व्हायरल
इंदूर : येथील महापालिकेविरुद्ध अस्खलित इंग्रजीतून संताप व्यक्त करणाऱ्या एका भाजीवालीचा व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवर व्हायरल झाला आहे. आपण इंदूरच्या देवी अहिल्या विद्यापीठातून मटेरिलय सायन्समध्ये पीएच.डी. केल्याचा दावा या महिलेने केला आहे. पीएच.डी. असलेली भाजीवाली बघून इंटरनेटवर आश्चर्य व्यक्त होत आहे.
रईसा अन्सारी असे या महिलेचे नाव आहे. इंदूरच्या रस्त्यावर ती भाज्यांची हातगाडी लावते. गुरुवारी महापालिकेच्या पथकाने अतिक्रमण हटाव कारवाई केली. त्यावेळी तिची हातगाडी हटविण्यात आली. त्यावेळी या महिलेने महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी थेट इंग्रजीतून संवाद साधून आपला संताप व्यक्त केला. अस्खलित इंग्रजी बोलणारी भाजीवाली बघून महापालिकेचे अधिकारीही क्षणभर अचंबित झाले. महापलिकेकडून भाजीपाला विक्रेत्यांचा विनाकारण छळ केला जात आहे, असा आरोप रईसा अन्सारी हिने यावेळी केला.
तिला शिक्षण विचारण्यात आले तेव्हा तिने आपण ‘रिसर्च स्कॉलर’ असल्याचे सांगितले. कोरोना विषाणूच्या साथीत वारंवार लावण्यात येत असलेल्या निर्बंधांमुळे फळे व भाजीपाला विक्रेते भिकेला लागले आहेत. दोन वेळच्या जेवणाची व्यवस्था करण्याएवढी कमाईही त्यांना होईनाशी झाली आहे, असे ती या व्हिडिओत सांगताना दिसते.
रईसा अस्खलित इंग्रजीत सांगते की, एका बाजूला बाजार बंद आहे. दुसºया बाजूने महापालिकेचे प्रशासन दडपशाही करीत आहे. ग्राहकही इकडे फिरकेनासे झाले आहेत. आम्ही आमच्या कुटुंबाला काय खाऊ घालावे? मी येथे फळे आणि भाजीपाला विकते. येथे उभे असलेले लोक माझे कुटुंबीय आणि मित्र आहेत. माझ्या कुटुंबात २० पेक्षा जास्त सदस्य आहेत. त्यांनी कसे जगावे? त्यांनी कशी कमाई करावी? आमच्या हातगाड्यांवर आता अजिबात गर्दी नाही, तरीही हे अधिकारी म्हणत आहेत की, येथून निघून जा.
मला नोकरी कोण देणार?
तू चांगली नोकरी का करीत नाही, या प्रश्नावर रईसाने म्हटले की, नोकरी मिळत नाही, म्हणून तर हा व्यवसाय स्वीकारला आहे. पहिला प्रश्न असा आहे की, मला नोकरी कोण देईल? मुस्लिमांमुळे कोरोना विषाणू पसरत आहे, अशी एक धारणा आधीच समाजात निर्माण झाली आहे. माझे नाव रईसा अन्सारी असल्यामुळे कोणतेही महाविद्यालय अथवा संशोधन संस्था मला नोकरी देण्यास इच्छुक नाही.