बाल्टिस्तानात सापडला प्राचीन ख्रिस्ती क्रॉस
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2020 03:54 AM2020-07-11T03:54:24+5:302020-07-11T03:55:22+5:30
स्कार्दू येथील बाल्टिस्तान विद्यापीठाच्या संशोधकांनी हा क्रॉस शोधला. जूनमध्ये सापडलेला हा क्रॉस संगरमरवरी असून, त्याचे वजन तीन ते चार टन आहे. त्याची उंची सुमारे सात फूट आहे. या उपखंडात सापडलेला हा अशा प्रकारचा सर्वांत मोठा क्रॉस मानला जात आहे.
नवी दिल्ली : पाकव्याप्त काश्मीरमधील बाल्टिस्तान प्रांतात सिंधू नदीच्या काठावर प्राचीन काळातील विशाल ख्रिस्ती क्रॉस सापडला आहे. या क्रॉसमुळे पाकिस्तानातील ख्रिश्चन इतिहासावर नव्याने प्रकाश पडण्यास मदत होणार आहे.
स्कार्दू येथील बाल्टिस्तान विद्यापीठाच्या संशोधकांनी हा क्रॉस शोधला. जूनमध्ये सापडलेला हा क्रॉस संगरमरवरी असून, त्याचे वजन तीन ते चार टन आहे. त्याची उंची सुमारे सात फूट आहे. या उपखंडात सापडलेला हा अशा प्रकारचा सर्वांत मोठा क्रॉस मानला जात आहे.
प्राथमिक विश्लेषणानुसार, हा ‘नेस्टोरियन क्रॉस’ आहे. तो इ.स. ९00 ते १२00 वर्षे या कालखंडातील असावा, असा अंदाज आहे. नेस्टोरियानिझम हा एक प्राचीन ख्रिस्ती पंथ असून, आशिया मायनर आणि सिरिया येथे तो निर्माण झाल्याचे मानले जाते. पौर्वात्य देशांत हा पंथ पसरलेला होता. जाणकारांच्या मते, या क्रॉसवर बौद्ध प्रभाव दिसून येत आहे. हा क्रॉस बनविला गेला तेव्हा या भागात बौद्ध धर्माचा -हास सुरू झालेला असू शकतो. तेव्हाच्या बौद्धांचा नवख्रिश्चनांशी सक्रिय संबंध आलेला असावा.
हा नेहमीचा थोमानियन क्रॉस आहे. थोमानियनय ख्रिश्चनांचा उदय सेंट थॉमसच्या धर्मप्रसारातून झालेला असल्याचे मानले जाते. सेंट थॉमस हा येशू ख्रिस्ताच्या १२ शिष्यांपैकी एक होता. नंतरच्या काळात थोमानियमन ख्रिश्चन नेस्टोरियन ख्रिश्चनांत मिसळून गेले. पाकिस्तानातील कायदे-आझम विद्यापीठाचे संशोधक वाजीद भट्टी यांनी सांगितले की, उत्तर पाकिस्तानात नेस्टोरियन ख्रिश्चनांच्या अनेक वसाहती होत्या. वसाहतवादी शक्तींच्या आक्रमणाआधीही उत्तर पाकिस्तानात ख्रिश्चनांचे अस्तित्व होते, याचा ठोस पुरावा या क्रॉसमुळे उपलब्ध झाला आहे.
या संशोधनात सहभागी असलेले बाल्टिस्तान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मुहंमद नईम खान यांनी सांगितले की, हिमालय-काराकोरम पर्वतरांगांतील स्कार्दू खोऱ्यात हा ऐतिहासिक क्रॉस सापडला आहे. हा भाग पाकव्याप्त काश्मीरमधील गिलगिट-बाल्टिस्तान प्रांतात येतो. पाकिस्तानी ख्रिश्चनांचा आत्मविश्वास वाढून त्यांना मुख्य प्रवाहात येण्यास या संशोधनामुळे मदत मिळेल.
पाकिस्तानात हिंदू आणि ख्रिश्चन धर्मीय लोक अल्पसंख्य आहेत. पाकिस्तानातील बहुतांश ख्रिश्चन पंजाब प्रांतात एकवटलेले आढळून येतात.
खान यांनी सांगितले की, क्रॉसच्या संशोधनामुळे युरोपीय देश आणि ख्रिस्ती धर्माचे उगमस्थान असलेल्या पश्चिम आशियासोबतच्या पाकिस्तानच्या सांस्कृतिक संबंधात वैविध्य येण्यास मदत होईल. पाकिस्तान आणि पाश्चात्त्य देशांतील संशोधक यांच्यात नवी शैक्षणिक भागीदारी होण्याचा मार्ग यातून मोकळा होऊ शकतो. भट्टी यांनी सांगितले की, ज्या परिसरात हा क्रॉस सापडला तेथील स्थानिक ख्रिश्चनांनी आम्हाला सांगितले की, येथे सेंट थॉमसने बांधलेले एक चर्च आहे. उत्तर पाकिस्तानात थोमानियन ख्रिश्चनांच्या अस्तित्वाचा हा एक पुरावा ठरतो. लक्षणीय बाब म्हणजे, भारताच्या मलबार किनारपट्टीवरील सिरियन ख्रिश्चन समुदायही स्वत:स सेंट थॉमसचे वंशज मानतो.
सध्या पाकिस्तानात नेस्टॉरियन ख्रिश्चनांचे अस्तित्व आढळत नाही. गिलगिट आणि स्कार्दू भागात अनुक्रमे १ हजार आणि ३00 पंजाबी ख्रिश्चन राहतात. मात्र, हे ख्रिश्चन फार अलीकडचे, ब्रिटिश वसाहतीच्या काळातील आहेत. भट्टी यांनी सांगितले की, सापडलेला हा प्राचीन ख्रिस्ती अवशेषाचा पहिलाच पुरावा नाही. १९३५ साली तक्षशिलाजवळील सिर्कप येथे एक क्रॉस सापडला होता. त्याच्याशी बाल्टिस्तानात सापडलेल्या क्रॉसचे लक्षणीय साधर्म्य आढळून येते.
रेशीममार्गे आगमन
या भागात ख्रिस्ती धर्माचे आगमन प्राचीन रेशीम मार्गाद्वारे झाले असल्याचे मानले जाते. स्कार्दूच्या पहाडावर सापडलेला क्रॉस रेशीम मार्गावरच आहे.
प्राचीन काळी इसवी सन पूर्व दुसºया शतकात चीनसोबतच्या रेशीम व्यापारासाठी या मार्गाचा मोठ्या प्रमाणात वापर सुरू झाला. त्यावरून त्याला रेशीम मार्ग हे नाव पडले. मात्र, या मार्गावरून रेशमाबरोबरच इतरही अनेक वस्तूंचा व्यापार होत होता.
सुमारे २ हजार वर्षे म्हणजेच १८ व्या शतकापर्यंत हा मार्ग चीन, भारत, पर्शिया, पश्चिम आशिया आणि युरोप एवढ्या व्यापक भूभागातील व्यापाराचा कणा होता.
या मार्गावरून व्यापारी तांड्यांबरोबरच राजकीय दूत, सैनिक, साधू-संन्याशी, भिख्खू आणि धर्मप्रसारक यांचीही ये-जा होत असे. याच मार्गावरून ख्रिश्चन धर्मप्रसारक पूर्वेकडे आले आणि ख्रिस्ती धर्माची बीजे येथे रोवली गेली, अशी माहिती आयन गिलमन आणि हान्स-जोकिम क्लिमकीट यांनी लिहिलेल्या ‘ख्रिश्चन्स इन एशिया बिफोर १५00’ या पुस्तकात दिली आहे.