नऊ हजार वर्षांपूर्वीचे अवशेष सापडले; राखीगढीतील प्राचीन मानवी सांगाड्यांची होणार डीएनए चाचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2022 12:47 PM2022-05-09T12:47:46+5:302022-05-09T12:47:53+5:30
उत्खननात हडप्पा संस्कृतीच्या काळातील काही सोन्याचे दागिनेही सापडले.
बलवंत तक्षक
लोकमत न्यूज नेटवर्क
चंडीगड : हरयाणातील हिसार जिल्ह्यातल्या राखीगढी गावात आर्किऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाने (एएसआय) केलेल्या उत्खननात नऊ हजार वर्षांपूर्वीच्या प्राचीन संस्कृतीचे अवशेष मिळाले आहेत. पुरातन काळातील दोन मानवी सांगाडे मिळाले असून, ते डीएनए तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. त्यातून आदिम मानवी संस्कृतीचे काही दुवे हाती लागण्याची शक्यता आहे.
यातून काही शिकता येईल...
एएसआयचे सहमहासंचालक डॉ. संजय मंजूल यांनी सांगितले की, राखीगढीमध्ये दरवेळी केलेल्या उत्खननात निरनिराळ्या गोष्टी सापडल्या आहेत. त्या भागात हडप्पा संस्कृतीच्या काळात असलेले नगर नियोजन हे आधुनिक काळातील नगर नियोजनाच्या तोडीस तोड होते. निसर्गाची हानी टाळून कसे जगायचे, हे प्राचीन नगर रचनेतून शिकता येते.
सोन्याचे अन् मातीचे दागिने
nउत्खननात हडप्पा संस्कृतीच्या काळातील काही सोन्याचे दागिनेही सापडले.
nकाही शिक्केही मिळाले. त्यावर तत्कालीन भाषेच्या लिपीत अक्षरेही चित्रित केली आहेत. त्यांचा अर्थबोध झाल्यास हडप्पा संस्कृतीच्या इतिहासावर आणखी प्रकाश पडू शकेल.
nमहिलांसाठी मातीपासून तयार केलेल्या मातीच्या बांगड्या, दगडाच्या मण्यांपासून तयार केलेल्या माळाही सापडल्या आहेत.
वस्तूंवर आहेत हत्तीची चित्रे
राखीगढीला मिळालेल्या वस्तूवर हत्तीची चित्रे काढली आहेत. त्यातील काही हत्तीच्या दातांच्या वस्तू आहेत. या गावातील लोक दुसऱ्या देशांशी व्यापार करीत असावेत.
- अजय यादव, संचालक, एएसआय