संभलच्या आणखी एका मुस्लिमबहुल भागात आढळले पुरातन मंदिर; पोलिसांनी तोडले कुलूप
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2024 16:53 IST2024-12-17T16:52:52+5:302024-12-17T16:53:04+5:30
मंदिराच्या आजुबाजूला घरे बांधून परिसर झाकण्यात आला आहे.

संभलच्या आणखी एका मुस्लिमबहुल भागात आढळले पुरातन मंदिर; पोलिसांनी तोडले कुलूप
Uttar Pradesh :उत्तर प्रदेशातील संभल येथे मुस्लिमबहुल परिसरात प्राचीन मंदिर सापडले. या मंदिराच्या परिसरात अतिक्रमण करुन, मंदिर पूर्णपणे झाकण्यात आले होते. या घटनेची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. दरम्यान, आता याच परिसरात आणखी एक मंदिर सापडले आहे. या मंदिराच्याही आजुबाजूला घरे बांधून मंदिर झाकण्यात आले होते. दाट वस्तीच्या भागात मंदिर दिसताच पोलिसांनी त्याचे कुलूप तोडले आणि साफसफाई सुरू केली.
मिळालेल्या माहितीनुसार, संभलच्या हयातनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सरयात्रीणमध्ये हे मंदिर सापडले आहे. तर, पहिले मंदिर संभलच्या खग्गु सराई भागात सापडले आहे. ही दोन्ही मंदिरे हनुमानाची असून, प्राचीन असल्याचा दावा स्थानिकांनी केला आहे. आज सापडलेल्या मंदिरावर अतिक्रमण झाले नाही, पण आजुबाजूला मोठमोठी घरे बांधून परिसर पूर्णपणे झाकण्यात आला आहे. पोलिसांनी मंदिराचा दरवाजा उघडला असता, आतमध्ये हनुमान आणि राधाकृष्णाच्या सुंदर मूर्ती आढळल्या.
यापूर्वी शनिवारी(दि.14) सापडलेल्या मंदिराबद्दल सांगायचे तर, संभल हिंसाचारानंतर आरोपींच्या विरोधात शोध मोहीम राबवण्यात आली होती. यावेळी वीजचोरीच्या घटना पाहून एसपी कृष्ण कुमार बिश्नोई संतापले. वीज विभागाच्या अधिकाऱ्यांनी एसपींना सांगितले की, आम्ही तपासणीसाठी जातो, तेव्हा दबंग लोक आम्हाला धमकावतात. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलीस आणि प्रशासनाने अवैध अतिक्रमण आणि वीजचोरीविरोधात मोठी कारवाई सुरू केली.
त्यानंतर मशिदी आणि घरांवर छापे टाकून मोठ्या प्रमाणात वीजचोरी उघडकीस आली. यावेळी दीपा राय परिसरात तपासणी करत असताना त्यांना अचानक 1978 सालचे मंदिर आढळून आले. 46 वर्षांपासून बंद असलेले मंदिर सपा खासदार झियाउर रहमान बुर्के यांच्या घरापासून 200 मीटर अंतरावर सापडले. मंदिरात हनुमानाची मूर्ती, शिवलिंग आणि नंदीची मूर्ती आढळली. प्रशासनाने मंदिर खुले केले असून, इथे पुजा सुरू झाली आहे.