बिहारमधील प्राचीन मंदिरे होणार पर्यटनाचा कॉरिडॉर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2024 06:45 AM2024-07-24T06:45:33+5:302024-07-24T06:45:47+5:30
राजगीर मंदिर हिंदू, बौद्ध आणि जैन धर्मीयांसाठी महत्त्वाचे श्रद्धास्थान असून, या मंदिराच्या विकासासाठी खास निधीची व्यवस्था करण्यात आली आहे.
केंद्रीय अर्थसंकल्पात पर्यटन प्रकल्पांवर भर देताना ‘युनेस्को’ने जागतिक वारसा स्थान म्हणून जाहीर केलेले बिहारमधील प्रसिद्ध बौद्धविहार महाबोधी मंदिर तसेच प्राचीन हिंदू देवस्थानांपैकी एक असलेले विष्णुपद मंदिर हे जागतिक दर्जाचे तीर्थक्षेत्र व पर्यटन कॉरिडॉर म्हणून विकसित करण्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली. तसेच राजगीर मंदिर आणि नालंदाच्या विकासाच्या घोषणाही करण्यात आल्या आहेत. अर्थसंकल्पात पर्यटनासाठी एकूण २,४७९ कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
राजगीर मंदिर हिंदू, बौद्ध आणि जैन धर्मीयांसाठी महत्त्वाचे श्रद्धास्थान असून, या मंदिराच्या विकासासाठी खास निधीची व्यवस्था करण्यात आली आहे. जैन मंदिर संकुलातील हे २०वे तीर्थंकर मुनिसुव्रत मंदिर प्राचीन आहे. येथे सप्तऋषी किंवा सात गरम पाण्याचे झरे एक उबदार पाण्याचे ब्रह्म कुंड तयार करतात. जे पवित्र मानले जाते. भाविकांची याप्रती मोठी श्रद्धा आहे. ‘राजगीर’साठी एक व्यापक विकास उपक्रम राबविला जाईल, असे सीतारामन यांनी जाहीर केले.
नालंदा पर्यटन केंद्र म्हणून विकसित करताना नालंदा विद्यापीठाला गौरवशाली उंचीवर नेऊन पुनरुज्जीवित करण्यासाठी केंद्र सरकार पाठिंबा देणार आहे.
ओडिशा राज्यातील निसर्गसौंदर्य, मंदिरे, स्मारके, कारागिरी, वन्यजीव अभयारण्ये, प्राचीन समुद्रकिनारे आदींच्या विकासासाठी भरीव आर्थिक साहाय्य देणार.
काशी विश्वनाथ मंदिर कॉरिडॉरचे मॉडेल यशस्वी झाले आहे, त्याच धर्तीवर बिहारमधील मंदिरांचा सर्वसमावेशक विकास केला जाईल.
यामुळे रोजगारही निर्माण होतील आणि गुंतवणुकीलाही चालना मिळेल, असे सीतारामन यांनी म्हटले आहे.