... तर हनुमानजी भाजपाची संपूर्ण लंका जाळून टाकतील, 'बब्बर' टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2018 11:45 AM2018-12-25T11:45:44+5:302018-12-25T11:47:20+5:30
भाजपा आमदार बुक्कल नवाब यांनी हनुमान हे मुस्लीम होते, असे म्हटले.
नवी दिल्ली - बजरंगबली हनुमान यांच्या जातीवरुन सुरू झालेल्या वादाचा काँग्रेसकडून समाचार घेण्यात आला आहे. काँग्रेस नेते राज बब्बर यांनी भाजपा नेत्यांवर निशाणा साधला. जातीपातीच्या राजकारणामुळेच भाजपाला तीन राज्यातील सत्तेतून हद्दपार व्हावे लागले आहे. भाजपाकडून हनुमानजींच्या जातीचंही असंच राजकारण करण्यात आलं, तर हनुमानजी भाजपाची लंका जाळून टाकतील, असे राज बब्बर यांनी म्हटले आहे.
भाजपा आमदार बुक्कल नवाब यांनी हनुमान हे मुस्लीम होते, असे म्हटले आहे. तसेच योगी कॅबिनेटमधील मंत्री चौधरी लक्ष्मी नारायण यांनी हनुमान हे जाट समाजाचे होते, असा दावा केला होता. तर योगींच्या कॅबिनेटमधील मंत्री आणि माजी क्रीडापटू चेतन चौहानी यांनी हनुमान कुस्ती खेळत होते, त्यामुळे ते एक खेळाडू होते, असे म्हटले. युपीतील भाजापा नेत्यांच्या या वक्तव्यांचा उत्तर प्रदेश काँग्रेस अध्यक्ष राज बब्बर यांनी आपल्या शैलत समाचार घेतला. भाजपा नेत्यांनी हनुमानजींची जात सांगण्याचा प्रयत्न केला. त्यामुळेच नाराज होऊन हनुमानजींनी आपल्या शेपटीचा वापर करुन भाजपचे तीन राज्यातील सरकार पाडले. पण, भाजपा नेत्यांनी आणखी जास्तीचे बोलल्यास हनुमानजी भाजपाची संपूर्ण लंकाच आपल्या शेपटीने जाळून टाकतील, असे बब्बर यांनी म्हटलंय.
तसेच नसरुद्दीन शाह यांनी केलेल्या वक्तव्यावरही बब्बर यांनी आपली प्रतिक्रिया दिली. नसीर ज्येष्ठ कलाकार असून ते एक वडिलही आहेत. त्यामुळेच, देशात बुलंदशहर आणि आग्र्यासारखी परिस्थिती उद्भवत असेल तर त्यांना काळजी वाटणं स्वाभाविकच आहे, असे बब्बर यांनी म्हटले. दरम्यान, बलुंदशहर येथील हिंसाचारात मृत्यूमुखी पडलेल्या पोलिसांचे मारेकरी अद्याप मोकाट असून त्यांचा बचाव करण्याचा प्रयत्न होत असल्याचेही बब्बर यांनी म्हटले.