...आणि भारताला मिळाली व्हाइसरॉयची बग्गी!
By admin | Published: January 25, 2017 05:04 PM2017-01-25T17:04:48+5:302017-01-25T17:04:48+5:30
ऐतिहासिक वारसा लाभलेली व्हाइसरॉयची बग्गी भारताला मिळण्यामागे एक रंजक इतिहास आहे
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 25 - स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन अशा राष्ट्रीय सणांच्या दिवशी राष्ट्रपतींची आलिशान बग्गी तुम्ही पाहिली असेलच. एकेकाळी ब्रिटिशांचे भारतातील व्हाइसरॉयच्या दिमतीला असणारी ही बग्गी सध्या भारताचे राष्ट्रपती अनेक महत्त्वाच्या कार्यक्रामांना उपस्थित राहण्यासाठी जाताना वापरतात. अशी ही ऐतिहासिक वारसा लाभलेली बग्गी भारताला मिळण्यामागे एक रंजक इतिहास आहे.
1947 साली भारत आणि पाकिस्तान यांची फाळणी झाल्यावर ही बग्गी कोणाला द्यायची यावरून पेच निर्माण झाला. दोन्ही देशांनी या बग्गीवर आपला अधिकार सांगितला होता. स्वातंत्र्यानंतर देशातील संपत्तीची भारत आणि पाकिस्तानमध्ये वाटणी झाली. त्यावेळी दोन्ही देश या बग्गीसाठी अडून बसले. कोणताही तोडगा निघत नसल्याने अखेर बग्गीच्या मालकीसाठी नाणेफेक करण्याचा निर्णय झाला.
या निर्णयानुसार ब्रिटिश व्हाइसरॉयच्या अंगरक्षकांच्या तुकडीतील तत्काली कमांडेट आणि डेप्युटी कमांडेट यांच्यात नाणेफेक करण्यात आली. त्यापैकी मुस्लिम असलेल्या डेप्युटी कमांडेंटनी पाकिस्तानात जाण्याचा निर्णय घेतला होता. अखेर नाणेफेक झाली आणि त्याचा कौल भारताच्या कमांडेंटच्या बाजूने लागला. त्याबरोबरच व्हाइसरॉयची बग्गीही भारताला मिळाली.