...आणि भारतीय लष्कराच्या जवानांनी पुन्हा एकदा मारली पाकव्याप्त काश्मीरमध्ये धडक
By बाळकृष्ण परब | Published: December 1, 2020 07:13 PM2020-12-01T19:13:42+5:302020-12-01T19:15:49+5:30
Indian Army News : नगरोटा येथे मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांनी घुसखोरी केलेल्या ठिकाणाचा शोध लावण्यासाठी भारतीय लष्कराच्या जवानांनी नियंत्रण रेषेखालून थेट पाकव्याप्त काश्मीरमध्ये धडक मारल्याचे समोर आले आहे.
नवी दिल्ली - काही दिवसांपूर्वी नगरोटा येथील टोलनाक्यावर झालेल्या चकमकीत लष्कराने पाकिस्तानमधून आलेल्या चार दहशतवाद्यांना कंठस्नान घातले होते. हे दहशतवादी नियंत्रण रेषा ओलांडून भारतात आल्याचे समोर आले होते. दरम्यान, या दहशतवाद्यांनी घुसखोरी केलेल्या ठिकाणाचा शोध लावण्यासाठी भारतीय लष्कराच्या जवानांनी नियंत्रण रेषेखालून थेट पाकव्याप्त काश्मीरमध्ये धडक मारल्याचे समोर आले आहे. नगरोटा येथे मारले गेलेले दहशतवादी भुयारातून भारतात घुसले होते. या भुयारांमधूनच भारताच्या जवानांनी पाकव्याप्त काश्मीमध्ये सुमारे २०० मीटरपर्यंत धडक मारली.
केंद्र सरकारमधील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ही माहिती दिली आहे. या अधिकाऱ्याने सांगितले की, सुरक्षा दलांचे जवान पाकव्याप्त काश्मीरच्या हद्दीत सुमारे २०० मीटरपर्यंत आत गेले होते. हे जवान भुयाराच्या सुरुवातीपर्यंत पोहोचले होते. नगरोटा येथे मारल्या गेलेल्या चार दहशतवाद्यांनी याच भुयाराचा वापर करून भारताच्या हद्दीत घुसखोरी केली होती.
जम्मू काश्मीरमधील सांबा सेक्टरमध्ये २२ नोव्हेंबर रोजी आंतरराष्ट्रीय सीमेजवळ दहशतवाद्यांनी घुसखोरीसाठी वापर केलेल्या १५० मीटर भुयाराचा शोध सुरक्षा दलांनी घेतला होता. दरम्यान मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांकडून फोन जप्त करण्यात आले होते. या फोनमधूनच या भुयाराची माहिती मिळाली होती.
बीएसएफ जम्मूचे फ्रंटियर, इन्स्पेक्टर जनरल एनएस जामवाल यांनी सांगितले की, असे वाटते की, नगरोटा एन्काऊंटरमध्ये सहभागी असलेल्या दहशतवाद्यांनी १५० मीटर लांब असलेल्या या भुयाराचा वापर को होता. कारण हे भुयार हल्लीच तयार केलेले आहे. तसेच या दहशतवाद्यांना मार्ग दाखवणारा कुणीतरी वाटाड्या होता. तोच त्यांना महामार्गापर्यंत घेऊन गेला असावा.
या भुयाराचे तोंड दाट झाडीमध्ये खबरदारीपूर्वक लपवण्यात आले होते. त्यावर माती आणि रानटी झाडे टाकून ते झाकण्यात आले होते. भुयाराचे तोंड मजबूत करण्यात आले होते. त्यावर पाकिस्तानी चिन्हे असलेल्या वाळूच्या पिशव्या होत्या. हे नव्याने खोदलेले भुयार होते. तसेच त्याचा पहिल्यांदाच वापर करण्यात आला होता. दरम्यान , येथून भरतात घुसलेले दहशतवादी नगरोटा येथे मारले गेले होते.