...आणि राष्ट्रपतींनी स्टेजच्या खाली येऊन दिला पुरस्कार
By admin | Published: August 29, 2016 07:27 PM2016-08-29T19:27:04+5:302016-08-29T19:31:12+5:30
विनेश फोगट हिचा राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी स्टेजवरून खाली येत अर्जुन पुरस्कार देऊन गौरव केला आहे.
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 29 - रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत कुस्तीमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करणारी विनेश फोगट हिचा राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी स्टेजवरून खाली येत अर्जुन पुरस्कार देऊन गौरव केला आहे. विशेष म्हणजे रिओ ऑलिम्पिकमध्ये खेळादरम्यान जखमी झालेली विनेश फोगट व्हिलचेअरवरून आली असता राष्ट्रपती प्रणव मुखर्जींनी स्टेजवरून खाली येत दोन पावलं चालत तिचा पुरस्कार देऊन सन्मान केला आहे. त्यामुळे अर्थातच उपस्थितांमध्ये हा चर्चेचा विषय ठरला आहे.
राष्ट्रपती प्रणव मुखर्जींनी प्रसंगावधान दाखवत केलेल्या कृतीबाबत त्यांचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे. ज्यावेळी रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताला पहिलं पदक मिळालं त्याचदरम्यान विनेश फोगट खेळताना जखमी झाल्यानं तिला सुरू असलेल्या खेळातून स्ट्रेचरवरून न्यावं लागले. तिच्या स्नायूंना दुखापत झाल्यानं तिला मध्येच खेळातून माघार घ्यावी लागली होती. भारताच्या खेळ अधिका-यांच्या मते या दुखापतीतून सावरण्यासाठी तिला एक महिन्याचा कालावधी लागला आहे. मात्र राष्ट्रपतींनी दाखवलेल्या समयसूचकतेमुळे त्याचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
पी. व्ही. सिंधू, साक्षी मलिक, दीपा कर्माकर आणि नेमबाज जीतू राय यांचाही राष्ट्रपती प्रणव मुखर्जींच्या हस्ते राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राष्ट्रपती भवनात झालेल्या या कार्यक्रमात खेलरत्न, द्रोणाचार्य आणि अर्जुन पुरस्कार देण्यात आले आहेत.