... अन् राजनाथसिंहांनी पुष्पहारातून स्वत:चं डोकं बाहेर काढलं; व्हिडिओ आला समोर
By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2024 01:09 PM2024-02-19T13:09:49+5:302024-02-19T13:22:31+5:30
राजधानी दिल्लीत भाजपाच्या राष्ट्रीय अधिवेशनातून मोदींनी अब की बार ४०० पार असा नारा देत पदाधिकारी व कार्यकर्त्यांना ऊर्जा दिली
मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी रविवार (१८ फेब्रुवारी २०२४) रोजी राजधानी दिल्लीतील भारत मंडपम येथे आयोजित भारतीय जनता पक्षाच्या (BJP) राष्ट्रीय अधिवेशनात कार्यकर्त्यांना आणि पक्षाच्या नेत्यांना संबोधित केले. त्यांनी पक्ष कार्यकर्त्यांना नवीन ऊर्जा दिली, तसेच पुढील १०० दिवस उत्साहाने काम करण्याचे आवाहनही केले. यावेळी, भाजपाच्या प्रमुख नेत्यांकडून मोदींचा पुष्पहार घालून सन्मान करण्यात आला. त्यावेळी, अगोदर मोदींसह पुष्पहारात स्वत:ही आलेल्या संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी हळूच आपलं डोकं हारातून बाहेर काढलं.
राजधानी दिल्लीत भाजपाच्या राष्ट्रीय अधिवेशनातून मोदींनी अब की बार ४०० पार असा नारा देत पदाधिकारी व कार्यकर्त्यांना ऊर्जा दिली. पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले, 'मी येथे उपस्थित सर्व कार्यकर्त्यांचे अभिनंदन करतो. भाजप कार्यकर्ते वर्षातील प्रत्येक दिवशी, 24 तास देशाची सेवा करण्यासाठी काहीतरी करत राहतात. पण आता पुढचे 100 दिवस नव्या ऊर्जेने, नव्या उमेदीने, नव्या आत्मविश्वासाने काम करायचे आहे. प्रत्येक नवीन मतदार, प्रत्येक लाभार्थी, प्रत्येक वर्ग, समाज, पंथ, परंपरा या सर्वांपर्यंत पोहोचावे आणि सर्वांचा विश्वास संपादन करावा. सर्वांनी प्रयत्न केल्यावर भाजपला जास्तीत जास्त जागा मिळून आणखी देशसेवा करता येईल.' दरम्यान, तत्पूर्वी भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांकडून मोदींचा सत्कार करण्यात आला.
मोदी जी को जय श्री राम!#BJPNationalCouncil2024pic.twitter.com/CSt6Z0Tw1K
— Smriti Z Irani (@smritiirani) February 18, 2024
भाजपाचे प्रमुख पदाधिकारी व राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, गृहमंत्री अमित शाह आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मोदींना पुष्पहार घालून त्यांचा सन्मान केला. यावेळी, मोदींनी हात जोडून सर्वांना अभिवादन केले. दरम्यान, यावेळी मोदींसमवेतचा पुष्पहार देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनीही आपल्या गळ्यात घातला होता. मात्र, केवळ पंतप्रधानांच्याच गळ्यात हा हार असल्याचे लक्षात येताच, त्यांनी आपलं डोकं अलगदपणे हारातून बाहेर काढलं. राजनाथ सिंह यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियातून समोर आला आहे. केंद्रीयमंत्री स्मृती इराणी यांनी ट्विट केलेल्या व्हिडिओत हे दिसून येते. त्यानंतर, केवळ मोदींनाच तो पुष्हार घालून भाजपाचे हे दिग्गज नेते आणि मंत्री हात हाती घेऊन बाजुला उभे असल्याचे दिसून येते. व्हिडिओत केंद्रीयमंत्री नितीन गडकरी हेही दिसून येतात.
'मोदी म्हणाले एनडीए ४०० पार'
गेल्या १० वर्षात भारताने जी गती गाठली, मोठी उद्दिष्टे साध्य करण्याचे धाडस दाखवले, ते अभूतपूर्व आहेत. भारताने प्रत्येक क्षेत्रात जी उंची गाठली, त्याे प्रत्येक देशवासीयाला एकत्र केले. आता देश ना छोटी स्वप्ने पाहतो ना छोटे संकल्प करतो. आता देशाची स्वप्नेही मोठी असतील आणि संकल्पही प्रचंड असतील. हाच विकसित भारताचा संकल्प आहे. आज विरोधी पक्षाचे नेतेही एनडीए सरकार ४०० पारच्या घोषणा देत आहेत. एनडीएला ४०० चा टप्पा पार करण्यासाठी भाजपला ३७० चा टप्पा पार करावा लागेल,' असेही मोदी यावेळी म्हणाले.