"...आणि बलात्काऱ्यांनाही", PM नरेंद्र मोदींच्या 'कबुतर-चित्ता' वक्तव्यावर ओवेसींचा घणाघात
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2022 01:44 PM2022-10-19T13:44:17+5:302022-10-19T13:44:36+5:30
गुजरात सरकारने बिल्किस बानो प्रकरणातील 11 दोषींची नुकतीच सुटका केली आहे. यावरून भाजप सरकारवर टीका होत आहे.
नवी दिल्ली: AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात कबुतर आणि चित्त्यावर केलेल्या वक्तव्यावर शेलक्या शब्दात टीका केली आहे. मंगळवारी गुजरातमध्ये डिफेन्स एक्स्पोचे उद्घाटन करताना पंतप्रधान मोदी म्हणाले होते की, 'आधी आपण कबुतर सोडायचो, आता चित्ता सोडत आहोत.'
पीएम मोदींच्या या वक्तव्यावर ट्विट करत असदुद्दीन ओवेसी यांनी लिहिले की, “...आणि बलात्कारी”. ओवेसी यांचा हा टोमणा बिल्किस बानो प्रकरणाबाबत होता. गुजरात सरकारने बिल्किस बानो प्रकरणातील 11 दोषींची नुकतीच सुटका केली आहे. यावरून भाजप सरकारवर टीकाही होत आहे. या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयातही आव्हान देण्यात आले आहे.
And rapists... https://t.co/qGCTgAJOQ5
— Asaduddin Owaisi (@asadowaisi) October 19, 2022
बिल्किस बानोच्या कुटुंबीयांना मोदी भेटणार: ओवेसी
असदुद्दीन ओवेसी यांनी यापूर्वीही बिल्किस बानो आणि अंकिता हत्याकांडावरून भाजप सरकारला घेरले होते. ओवेसी यांनी गुजरातमधील अंबाजी येथे आयोजित सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महिला शक्तीच्या सन्मानावर केलेल्या भाषणाची खिल्ली उडवली होती. ओवेसी यांनी ट्विट करून म्हटले होते की, 'पंतप्रधान साहेब, कृपया बिल्किस बानो आणि अंकिताच्या कुटुंबियांना भेटा, त्यांना तुमच्याशी काही बोलायचे असेल...'
SC मध्ये 29 नोव्हेंबर रोजी सुनावणी
बिल्किस बानोसोबत झालेल्या सामूहिक बलात्कारातील दोषींच्या सुटकेविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. बिल्किस बानोच्या दोषींच्या सुटकेविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने गुजरात सरकारवर अनेक प्रश्न उपस्थित केले. आता सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणाची पुढील सुनावणी 29 नोव्हेंबरला होणार आहे.