... अन् सासरवाडीत रुसून गाडीतच बसले जावईबापू 'लालू प्रसाद यादव'
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2023 03:38 PM2023-08-23T15:38:06+5:302023-08-23T15:58:49+5:30
लालू प्रसाद यादव हे आपल्या गंमतीशीर स्वभावामुळे आणि भाषणांमुळेही प्रसिद्ध आहेत.
पाटणा - नुकताच धोंड्याचा महिना पार पडला, या महिन्यात सगळीकडे जावईबापूंची मौज होती. सासूबाईंनी लाडक्या जावयाला घरी बोलावून गोड-धोड घाऊ घालून फुल्ल अहेर केला. त्यामुळे, तीन वर्षांपासून धोंड्याच्या महिन्याची वाट पाहणाऱ्या जावईबापूंना हा महिना सार्थकी लागला. जावयाला सासरी मान-सन्मान आणि पाहुणचार अधिक मिळतो. मात्र, ही गोष्ट सर्वसामान्य लोकांतच नाही, तर बड्या नेत्यांमध्येही तशीच असते. स्वत: माजी केंद्रीयमंत्री आणि राजदचे सुप्रिमो लालू प्रसाद यादव यांनी दाखवून दिली. लालू सासरी रुसून बसल्याचं पाहायला मिळालं.
लालू प्रसाद यादव हे आपल्या गंमतीशीर स्वभावामुळे आणि भाषणांमुळेही प्रसिद्ध आहेत. मंगळवारी तब्बल ७ वर्षानंतर ते आपल्या मूळगावी फुलवरिया येथे पोहोचले. त्यानंतर, जवळच असलेल्या सेलार कला या सासरच्या गावालाही भेट दिली. राबडी देवी आणि जावई लालू प्रसाद यादव गावात आल्यामुळे गावकऱ्यांनी त्यांच्या कारभोवती गराडा घातला होता. मात्र, दोघेही कारमधून बाहेर उतरले नाहीत. त्यानंतर, राबडीदेवी यांच्या घरातून महिला सदस्य आल्यानंतर त्यांनी राबडी देवींना गाडीतून बाहेर बोलावत घरी नेले. राबडीदेवी यांच्यासोबत त्यांचे सुपुत्र तेज प्रताप हेही मामाच्या घरी पोहोचले.
लेक आपल्या घरी गेली, पण जावई लालू प्रसाद यादव रुसुन गाडीतच बसले. जोपर्यंत सासरहून कोणीतरी, म्हणजे त्यांचा मेव्हणा त्यांना नेण्यासाठी आला नाही, तोपर्यंत ते गाडीतून खाली उतरलेच नाहीत. जावईबापू रुसल्याचे कळताच त्यांचा चुलत मेव्हणा रमाकांत यादव त्यांना नेण्यासाठी आले. त्यानंतर, लालू प्रसाद यादव यांच्यापुढे हात जोडून विनंती करू लागले. मग, लालू यादव तयार झाले आणि विनंतीला मान देऊन ते गाडीतून उतरुन घरी गेले. मात्र, लालू प्रसाद यांचा हा मजेशीर तोरा पाहून गावात चांगलीच चर्चा रंगली आहे. तसेच, गावच्या परंपरांना उजाळाही मिळाला.
दरम्यान, लालू प्रसाद यादव यांचे सख्खे मेव्हणे प्रभुनाथ यादव, साधु यादव आणि सुभाष यादव हे तिन्ही भाऊ त्यावेळी सेलार कला गावात उपस्थित नव्हते.