...आणि ते अखेर मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसले !
By admin | Published: February 18, 2015 01:29 AM2015-02-18T01:29:04+5:302015-02-18T01:29:04+5:30
तामिळनाडूचे मुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम यांनी मंगळवारी विधानसभेत मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला.
चेन्नई : तामिळनाडूचे मुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम यांनी मंगळवारी विधानसभेत मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. गेल्या अधिवेशनात त्यांनी माजी मुख्यमंत्री तथा अण्णाद्रमुकच्या सर्वेसर्वा जयललिता यांची खुर्ची रिक्त सोडत त्यांच्याप्रती निष्ठा व्यक्त केल्याने त्यांच्यावर विरोधकांनी चौफेर हल्ला चढविला होता.
जयललिता यांना भ्रष्टाचाराच्या प्रकरणात कारावास झाल्यानंतर त्यांनी राजीनामा देत आपल्याशी सर्वाधिक निष्ठावान असलेल्या पनीरसेल्वम यांच्याकडे सरकारचे नेतृत्व सोपवले होते. गेल्या अधिवेशनात पनीरसेल्वम यांनी अर्थमंत्र्यांच्या खुर्चीवर बसूनच कामकाज सांभाळले. मंगळवारी सकाळी सभागृहाचे कामकाज सुरू होताच ते मुख्यमंत्र्यांच्या आसनावर बसलेले बघून सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. त्यावेळी राज्यपाल रोसय्या यांचे अभिभाषण सुरू होते.
दुसऱ्यांदा मुख्यमंत्री...
उत्पन्नाच्या स्रोतापेक्षा जास्त संपत्ती आढळून आल्याबद्दल जयललिता यांना दोषी ठरविण्यात आल्यानंतर त्यांनी पद सोडण्यासह आमदारकीचाही राजीनामा दिला आहे. गेल्यावर्षी सप्टेंबरमध्ये पनीरसेल्वम यांच्या गळ्यात दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची माळ पडली. याआधीही जयललिता यांना न्यायालयाच्या आदेशामुळे पद सोडावे लागल्यानंतर काही काळ पनीरसेल्वम हेच मुख्यमंत्री होते. (वृत्तसंस्था)