...आणि चार देशांचे प्रमुख अवतरले मोदी जॅकेट परिधान करुन
By admin | Published: October 16, 2016 09:07 AM2016-10-16T09:07:00+5:302016-10-16T09:07:00+5:30
गोव्यात सुरु असलेल्या ब्रिक्स संमेलनात पंतप्रधान मोदींची जादू पाहायला मिळाली. संमेलनासाठी आलेल्या चार देशांच्या प्रमुखांनी मोदी जॅकेट परिधान केलं होतं.
ऑनलाइन लोकमत
पणजी,दि. १६ : गोव्यात सुरु असलेल्या ब्रिक्स संमेलनात पंतप्रधान मोदींची जादू पाहायला मिळाली. संमेलनासाठी आलेल्या चार देशांच्या प्रमुखांनी मोदी जॅकेट परिधान केलं होतं. गोव्याच्या बेनौलीत ब्रिक्स परिषदेचा पहिला दिवस गाजला तो जगभरातल्या दिग्गज नेत्यांच्या भेटीगाठी, बैठका आणि पत्रकार परिषदांनी. मात्र दिवसभराच्या या भरगच्च कार्यक्रमानंतर हे सारे नेते जमले ते रात्रीच्या भोजनासाठी. यावेळी सा-यांच्या नजरा आकर्षित केल्या त्या या नेत्यांच्या ड्रेसिंग स्टाईलनं. ब्रिक्स देशाचे प्रमुख या रात्रीच्या जेवणासाठी चक्क मोदी जॅकेटमध्ये अवतरले.
ब्राझिलचे राष्ट्राध्यक्ष मायकेल टेमर, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आणि दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष जेकब झुमा हे भारतीय मोदी जॅकेट परिधान करुन अवतरले. त्यामुळं जगभरातल्या बिग बॉसवर मोदी जॅकेटची जादू झाल्याचं पाहायला मिळतंय.
पुतिन यांनी निळ्या रंगाचं, जिनपिंग आणि टेम यांनी लाल रंगाचं तर झुमा यांनी हिरव्या रंगाचं जॅकेट घातलं होतं. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी क्रीम रंगाचं जॅकेट परिधान केलं होतं.
भारत-रशिया द्विराष्ट्रीय शिखर बैठकीत शनिवारी सीमेपलीकडील दहशतवादाचा मुद्दा ठळकपणे चर्चेत आला. सीमेपलीकडील दहशतवाद रोखण्यासाठी दोन्ही राष्ट्रे कटिबद्ध असल्याची ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी व रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी संयुक्त निवेदनाद्वारे दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी व्यापक चर्चा केल्यानंतर दोन्ही देशांनी एकूण १६ सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या केल्या.