PUBG खेळता खेळता 'सब्जी'वाल्यावर जडलं प्रेम, भेटीसाठी 2500KM केला प्रवास!; पोलिसही चक्रावले
By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2023 01:02 PM2023-02-02T13:02:02+5:302023-02-02T13:02:48+5:30
प्रेम आंधळं असतं, ते एकदा एखाद्या व्यक्तीवर जडलं की प्रेमासाठी व्यक्ती जगातील कोणत्याही आव्हानाला सामोरं जाण्यास एका पायावर तयार होतो असं म्हणतात.
प्रेम आंधळं असतं, ते एकदा एखाद्या व्यक्तीवर जडलं की प्रेमासाठी व्यक्ती जगातील कोणत्याही आव्हानाला सामोरं जाण्यास एका पायावर तयार होतो असं म्हणतात. असाच एक प्रकार उत्तर प्रदेशातील बरेली येथून समोर आला आहे. बरेलीतील फरीदपूर येथील एका तरुणाचे PUBG खेळताना अंदमान-निकोबारमधील दहावीच्या विद्यार्थिनीवर प्रेम जडलं आणि त्यानंतर दोघांचं फेसबुकवर बोलणं सुरू झालं. प्रकरण इतकं पुढे गेलं की विद्यार्थिनी अंदमान निकोबारहून फरिदपूरला आपल्या प्रियकराला भेटायला आली. मुलीच्या नातेवाईकांना विद्यार्थिनी न सापडल्यानं त्यांनी अंदमान निकोबारमध्ये गुन्हा दाखल केला. पोलिसांच्या तपासात तरुणीचे लोकेशन बरेलीमध्ये आढळून आले.
अंदमान निकोबार पोलिसांनी बरेली येथे येऊन मुलीला ताब्यात घेतले आणि तिची वैद्यकीय तपासणी केली. बरेलीतील फरीदपूर पोलीस ठाण्यात राहणारा राजपाल भाजीविक्रेता आहे. त्याला मोबाईलवर PUBG खेळण्याचाही जणू व्यसनच जडलं होतं. एके दिवशी PUBG खेळत असताना, तो अंदमान आणि निकोबारमधील दहावीच्या विद्यार्थीनीच्या संपर्कात आला. ओळख वाढली आणि दोघं फेसबुकच्या माध्यमातून चॅट करू लागले.
प्रियकराला भेटण्यासाठी प्रेयसी अंदमानहून फरीदपूरला पोहोचली
काही वेळ बोलल्यानंतर विद्यार्थिनीने प्रियकराला भेटण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर २२ जानेवारीला तरुणी राजपालला भेटण्यासाठी अंदमान-निकोबारहून कोलकातामार्गे फरीदपूरला पोहोचली. विद्यार्थिनी घरी न परतल्यामुळे तिच्या नातेवाइकांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी विद्यार्थिनीच्या मोबाईलचे लोकेशन तपासले तेव्हा ते लोकेशन बरेलीचे आढळले. त्यानंतर अंदमान निकोबार पोलिसांनी बरेली गाठून विद्यार्थिनीला ताब्यात घेतले, मात्र तिचा प्रियकर राजपाल घटनास्थळावरुन पळून गेला. पोलिसांनी विद्यार्थिनीची वैद्यकीय तपासणी करून तिला अंदमान निकोबारला परत नेले.
प्रियकराला लग्न करायचे असेल तर दोन वर्षे अंदमानमध्ये राहावं लागणार
मुलगी इयत्ता दहावीची विद्यार्थिनी असून अद्याप ती अल्पवयीन आहे. अंदमान पोलिसांच्या म्हणण्यानुसार, मुलीचे कुटुंब त्या दोघांचं लग्न करुन देण्यास तयार आहे, परंतु त्या तरुणाला त्यांच्यासोबत अंदमान निकोबारमध्ये दोन वर्षे राहावं लागेल अशी अट कुटुंबीयांनी घातली आहे. मुलगी प्रौढ झाल्यावर तिचे लग्न केले जाईल. सध्या विद्यार्थिनीच्या कुटुंबीयांचा तिच्या प्रियकरावर विश्वास नाही, तो २ वर्ष तिच्यासोबत राहिल्यानंतरच त्यांचं लग्न करुन देऊ असं पालकांनी म्हटलं आहे.