बिहारमध्ये आॅनर किलिंग; मुलीच्या सासू-सास-याची केली हत्या, मुलगा अन्य जातीतील असल्याने राग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2017 12:17 AM2017-09-10T00:17:47+5:302017-09-10T00:18:05+5:30
आपल्या मुलीने खालच्या जातीतील तरुणाशी विवाह केल्यामुळे संतापलेल्या त्या तरुणाच्या आई-वडिलांची गोळ्या घालून हत्या केल्याचा प्रकार बिहारमध्ये घडला आहे. कैमूर जिल्ह्यातील मुबारकपूर गावातील ही घटना आहे.
पाटणा : आपल्या मुलीने खालच्या जातीतील तरुणाशी विवाह केल्यामुळे संतापलेल्या त्या तरुणाच्या आई-वडिलांची गोळ्या घालून हत्या केल्याचा प्रकार बिहारमध्ये घडला आहे. कैमूर जिल्ह्यातील मुबारकपूर गावातील ही घटना आहे. हल्ल्यात दाम्पत्याच्या दोन मुलीही जखमी झाल्या आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कमल चौधरी (५0) व त्यांच्या पत्नी शांती देवी (४५) आपल्या मुलींसह घराच्या गच्चीवर झोपले होते. ते झोपेत असताना त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. त्या चोधरी दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला. हल्ल्यात कमल चौधरी यांच्या मुली किरण देवी (२0) व सुश्मिता (१५) गंभीर जखमी झाल्या असून, त्यांना वाराणसीमधील इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्सेसमध्ये भरती करण्यात आले आहे.
हे आॅनर किलिंगचे प्रकरण आहे, असे पोलिसांनी सांगितले. जखमी किरण देवीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, तिचा भाऊ धर्मेंद्र चौधरी याचे तीन महिन्यांपूर्वी संबंधित मुलीशी प्रेमसंबंध जुळले होते. त्या दोघांनी लग्न केले आणि ते दिल्लीला राहायला गेले.
गावकºयांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार ती मुलगी राजपूत घराण्यातील आहे. धर्मेंद्र हा तरुण खालच्या जातीतील असल्याने मुलीच्या कुटुंबीयांना हा विवाह मान्य नव्हता. तरीही दोघांनी पळून जाऊ न विवाह केल्यामुळे मुलीचे नातेवाईक चिडले होते. सतत आपण बदला घेऊ, अशी धमकी नेहमी देत असत. मुलीचा भाऊदेखील गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला आहे. (वृत्तसंस्था)
यूपी पोलिसांची तपासासाठी घेणार मदत
पोलिसांनी चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये मुलीच्या घरातील तिघांची नावे आहेत, अशी माहिती कैमूरच्या पोलीस अधीक्षकांनी दिली. पोलिसांची तीन पथके मारेकºयांचा शोध घेण्यासाठी रवाना झाली आहेत. हे गाव बिहार व उत्तर प्रदेशच्या सीमेवर आहे. त्यामुळे आम्ही उत्तर प्रदेश पोलिसांंचीही मदत मागितली आहे, असे पोलीस अधीक्षक म्हणाले.