आंध्र प्रदेशात परिवहन मंत्र्यांच्या घराची जाळपोळ; नव्या जिल्ह्याच्या नावावरून उसळला हिंसाचार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2022 09:26 PM2022-05-24T21:26:23+5:302022-05-24T21:33:06+5:30
Andhra Minister's House Set On Fire : लाठीचार्ज केल्यानंतर आंदोलकांनी केलेल्या दगडफेकीत अनेक पोलीस जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.
आंध्र प्रदेशात नव्याने तयार करण्यात आलेल्या कोनासीमा (Konaseema) जिल्ह्याचे नाव बदलून बीआर आंबेडकर कोनासीमा (BR Ambedkar Konaseema) जिल्हा असे करण्याच्या प्रस्तावाच्या विरोधात मंगळवारी जिल्हा मुख्यालयावर आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलन करणाऱ्या लोकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्यानंतर येथील अमलापुरम शहरात हिंसाचार उसळला. या हिंसाचारात परिवहन मंत्री पिनिपे विश्वरुपू (Pinipe Viswarupu) यांचे घर जाळण्यात आले. मात्र, पोलिसांनी मंत्री आणि त्यांच्या कुटुंबीयांना सुखरूप बाहेर काढले.
लाठीचार्ज केल्यानंतर आंदोलकांनी केलेल्या दगडफेकीत अनेक पोलीस जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. शहरात पोलिसांची गाडी आणि शैक्षणिक संस्थेची बसही जाळण्यात आली. काही राजकीय पक्ष आणि समाजकंटकांनी जाळपोळ केल्याचा आरोप राज्याच्या गृहमंत्री तानेती वनिता (Taneti Vanitha) यांनी केला आहे. "या घटनेत जवळपास 20 पोलीस कर्मचारी जखमी होणे दुर्दैवी आहे. आम्ही या प्रकरणाची चौकशी करून दोषींना न्याय देऊ", असे तानेती वनिता यांनी म्हटले आहे.
#WATCH | MLA Ponnada Satish's house was set on fire by protestors in Konaseema district in Andhra Pradesh today, the protests were opposing the naming of the district as Dr BR Ambedkar Konaseema district pic.twitter.com/XzJskKqhz3
— ANI (@ANI) May 24, 2022
4 एप्रिलला कोनसीमा जिल्ह्याची निर्मिती
4 एप्रिल रोजी पूर्व गोदावरी जिल्ह्यापासून वेगळे करून कोनसीमा जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. गेल्या आठवड्यात, राज्य सरकारने कोनसीमा जिल्ह्याचे नाव बदलून बीआर आंबेडकर कोनसीमा जिल्हा करण्यासाठी प्राथमिक अधिसूचना जारी करून लोकांकडून हरकती मागवल्या होत्या. यानंतर कोनसीमा साधना समितीने (Konaseema Sadhana Samiti) नाव बदलण्याच्या प्रस्तावावर आक्षेप घेत जिल्ह्याचे नाव कोनसीमा असेच ठेवण्याची मागणी केली.
जिल्ह्याच्या नामांतराच्या विरोधात जिल्हा दंडाधिकारी हिमांशू शुक्ला यांना निवेदन देण्याचा प्रयत्न सुरू असताना कोनसीमा साधना समितीने मंगळवारी आंदोनल केले. पोलिसांनी आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे आंदोलक संतप्त झाले आणि अखेर अमलापुरममध्ये (Amalapuram) जाळपोळ झाल्याची घटना घडली.