आंध्र-ओडिशात अतिसतर्कतेचा इशारा

By admin | Published: October 10, 2014 03:41 AM2014-10-10T03:41:09+5:302014-10-10T03:41:09+5:30

१२ आॅक्टोबर रोजी आंध्रात दाखल होण्याची तसेच या प्रदेशात शनिवारपासूनच जोरदार पर्जन्यवृष्टीची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

Andhra-Odisha Vigilance Warning | आंध्र-ओडिशात अतिसतर्कतेचा इशारा

आंध्र-ओडिशात अतिसतर्कतेचा इशारा

Next

नवी दिल्ली : एका रंगीत चिमणीच्या नावावरून हुडहुड हे नाव मिळालेले चक्रीवादळ ओडिशा व आंध्रच्या किनारपट्टीकडे वेगाने आगेकूच करीत असून ते १२ आॅक्टोबर रोजी आंध्रात दाखल होण्याची तसेच या प्रदेशात शनिवारपासूनच जोरदार पर्जन्यवृष्टीची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
हवामान खात्याने जारी केलेल्या निवेदनात, गुरुवारी सकाळी हे चक्रीवादळ गोपालपूरहून दक्षिणेकडे ७८० कि.मी. तर विशाखापट्टणमहून ७७० कि. मी. दक्षिण पूर्वेकडे केंद्रित होते. ते आता उत्तर पश्चिमेकडे सरकत असून येत्या १२ तासांत ते विक्राळ स्वरूप धारण करेल व २४ तासांत त्याचे हे भीषण स्वरूप अधिकच वाढेल आणि १२ आॅक्टोबर रोजी दुपारपर्यंत ते आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर दाखल होईल असे सांगण्यात आले
आहे.
अंदमान निकोबार बेटांवर या चक्रीवादळामुळे कोणत्याही प्रतिकूल हवामानाचा पूर्व अंदाज नसल्याने या बेटांवर डी वॉर्निंग जारी करण्यात आली आहे. मात्र, आंध्र प्रदेशच्या उत्तर भागात आणि ओडिशाच्या दक्षिण भागात ११ आॅक्टोबरच्या संध्याकाळपासूनच पावसाच्या जोरदार सरी कोसळण्याची शक्यता आहे.
काही भागात जोरदार पर्जन्यवृष्टीची तर काही भागात भीषण वृष्टीची शक्यता आहे. या चक्रीवादळामुळे रस्ते व रेल्वे वाहतूक, वीज व संपर्क यंत्रणा प्रभावित होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
केंद्रानेही केली तयारी
येत्या दोन-तीन दिवसांत आंध्र व ओडिशाच्या किनारपट्टीवर येऊन आदळणाऱ्या हुडहुड या चक्रीवादळाला सामोरे जाण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रबंधन समितीची बैठक गुरुवारी दिल्लीत घेण्यात आली.
या बैठकीत या चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी केलेल्या तयारीची पाहणी करण्यात आली. मंत्रिमडळाचे सचिव ए.के. सेठ यांच्या अध्यक्षतेत झालेल्या या बैठकीत राज्याच्या सर्व मुख्य सचिव व विभागांना चक्रीवादळाला तोंड देण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. हवामानखात्याच्या अंदाजानुसार हे वादळ १४० कि.मी. या वेगाने पुढे सरकत आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: Andhra-Odisha Vigilance Warning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.