१ कोटींसाठी बहिणीची हत्या; अपघात झाल्याचे सांगून डॉक्टरांचा अहवालही बदलला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2025 17:44 IST2025-01-30T17:43:42+5:302025-01-30T17:44:40+5:30

आंध्र प्रदेशात पैशांसाठी भावाने लहान बहिणीची हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे.

Andhra Pradesh Crime Real estate agent kills sister to get insurance money | १ कोटींसाठी बहिणीची हत्या; अपघात झाल्याचे सांगून डॉक्टरांचा अहवालही बदलला

१ कोटींसाठी बहिणीची हत्या; अपघात झाल्याचे सांगून डॉक्टरांचा अहवालही बदलला

Andhra Pradesh Crime: आंध्र प्रदेशातून हादरवून सोडणारी बातमी समोर आली आहे. आंध्र प्रदेशात एका रिअल इस्टेट व्यावसायिकाने पैशांसाठी स्वतःच्या लहान बहिणीची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. वर्षभरापूर्वी घडलेल्या या हत्याकांडासाठी पोलिसांनी आरोपी भावाला अटक केली आहे. तपासादरम्यान, भावानेच विम्याच्या पैशांसाठी बहिणीची हत्या केल्याचे उघड झालं. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन पुढील तपास सुरु केला आहे.

आंध्र प्रदेशातील प्रकाशम जिल्ह्यातील या रिअल इस्टेट व्यावसायिकाला त्याच्या घटस्फोटित आणि अपत्य नसलेल्या बहिणीची हत्या केल्याप्रकरणी अटक करण्यात आली. विम्याच्या माध्यमातून एक कोटी रुपये कमावण्याच्या उद्देशाने आरोपी भावाने हा सगळा प्रकार केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मलापती अशोक कुमार रेड्डी (३०) याने २ फेब्रुवारी २०२४ रोजी पोडिली येथील पेट्रोल पंपाजवळ बहिणीची हत्या केली होती. मंगळवारी पोलिसांनी याप्रकरणी मोठा खुलासा केला.

मालापती कुमार रेड्डीवर याच्यावर प्रचंड प्रमाणात कर्ज झालं होतं. त्यामुळे त्याने बहिणीच्या नावावर विविध कंपन्यांकडून १ कोटी रुपयांची विमा पॉलिसी घेण्याची योजना आखली. यानंतर विम्याचे पैसे मिळावेत म्हणून त्याने त्याने बहिणीचा खून करून तो अपघात असल्याचा दाखवून देण्याचा कट रचला होता. घटनेच्या दिवशी कुमार त्याच्या बहिणीला दवाखान्यात नेण्याच्या बहाण्याने कारमधून ओंगोल येथे घेऊन गेला होता. परत येताना त्याने बहिणीला झोपेच्या गोळ्या दिल्या आणि नंतर तिचा गळा दाबून खून केला. यानंतर त्याने हत्या लपविण्यासाठी कार झाडावर आदळली आणि बहिणीचा अपघाती मृत्यू झाल्याचा दावा केला. दुसऱ्या दिवशी, त्याचे वडील, मलापती थिरुपथिया यांनी पोडिल्ली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आणि त्यानंतर या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांना तपासात फॉरेन्सिक अहवालात तफावत आढळून आली. अशोक कुमार रेड्डी याने युसूफ या सरकारी रुग्णालयातील कर्मचाऱ्यासोबत झोपेच्या गोळ्यांचा पुरावा लपवण्यासाठी व्हिसेराच्या नमुन्यांमध्ये छेडछाड केल्याचे उघड झालं. विम्याच्या नोंदी आणि फॉरेन्सिक पुराव्याच्या आधारे पोलिसांनी अशोक रेड्डीला अटक केली. तर युसूफसह दोन साथीदार अद्याप फरार आहेत. पोलिसांनी अशोक कुमार रेड्डीविरोधात भारतीय दंड संहिता (आयपीसी) कलम १२० (बी), ३०२ आणि २०१ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला पोलिस कोठडी देण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
 

Web Title: Andhra Pradesh Crime Real estate agent kills sister to get insurance money

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.