आंध्र प्रदेशात चक्रीवादळाने लाखो लोकांचा गेला ‘निवारा’; आठ बेपत्ता
By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2020 01:41 AM2020-11-30T01:41:29+5:302020-11-30T01:41:58+5:30
एक लाखांवर लोकांना हलविले, १,५९७ गावांना या पुराचा फटका बसला आहे. सहा गावांना पुराचा सर्वाधिक फटका बसला आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, २२३ शिबिरे स्थापन करण्यात आली आहेत
विजयवाडा : निवार चक्रीवादळ आणि मुसळधार पावसाने चित्तोरमध्ये सहा आणि कडप्पात दोन जण बेपत्ता झाले आहेत.
प्राथमिक अंदाजानुसार, जोरदार पावसामुळे नेल्लोर, प्रकाशम, चित्तोर आणि कडप्पा जिल्ह्यांत १.१२ लाख लोकांना फटका बसला आहे. दोन हजारांवर घरांची पडझड झाली आहे. ८८ मोठी जनावरे, दोन हजारांहून अधिक लहान जनावरे आणि ८ हजारांवर कोंबड्या मृत्युमुखी पडल्या आहेत.
१,५९७ गावांना या पुराचा फटका बसला आहे. सहा गावांना पुराचा सर्वाधिक फटका बसला आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, २२३ शिबिरे स्थापन करण्यात आली आहेत. आतापर्यंत ४० हजारांवर व्यक्तींना पुरातून बाहेर काढण्यात आले असून, त्यांना आश्रय शिबिरात दाखल करण्यात आहे. चार जिल्ह्यांना मदतकार्यासाठी २.५० कोटी रुपये जारी करण्यात आले आहेत. शिबिरातील प्रत्येकाला ५०० रुपये विशेष साहाय्य देण्यात आले.
पिकांचे नुकसान
प्राथमिक अंदाजानुसार, नेल्लोर, प्रकाशम, चित्तोर आणि कडप्पा, कुर्नूलमध्ये २.१४ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. संबंधित विभागाकडून पिकांच्या नुकसानीची माहिती एकत्रित केली जात आहे. राज्य सरकारने मदतकार्यासाठी एनडीआरएफच्या आठ टीम आणि एसडीआरएफच्या सहा टीम तैनात केल्या आहेत. रेणीगुंटाजवळ फसलेल्या दोन लोकांना बाहेर काढण्यात यश मिळाले आहे, तसेच नेल्लोर जिल्ह्यातून फसलेल्या ६० लोकांना बाहेर काढण्यात आले आहे.