करदात्यांच्या पैशांचा दुरुपयोग; आंध्र प्रदेशच्या अर्थमंत्र्यांनी सिंगापूरमध्ये घेतले दंतोपचार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2018 01:32 PM2018-08-24T13:32:22+5:302018-08-24T13:35:13+5:30
राज्य सरकारने कोणतीही खळखळ न करता अर्थमंत्र्यांना उपचाराचे पैसेही देऊन टाकल्याचे स्पष्ट झाले आहे.
हैदराबाद- आम्हाला विशेष दर्जा द्या, पूरामुळे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी मदत द्या अशी मागणी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू करत असतात. मात्र त्यांच्या मंत्रिमंडळामधील सदस्यांनी मात्र करदात्यांच्या पैशाची उधळपट्टी सुरुच ठेवली आहे. आंध्रप्रदेशचे अर्थमंत्री यनमाला रामकृष्णूडू यांनी दातांवरील उपचारांसाठी थेट सिंगापूर गाठले आणि करदात्यांच्या पैशातून 2.88 लाख रुपये खर्च करुन ते परतले. राज्य सरकारने कोणतीही खळखळ न करता त्यांना उपचाराचे पैसेही देऊन टाकल्याचे स्पष्ट झाले आहे.
यावर्षी 12 एप्रिल रोजी रामकृष्णुडू यांनी सिंगापूरमधील अझुर डेंटल येथे रुट कनाल उपचार घेतले. या उपचारासांठी लागलेले सर्व पैसे त्यांना 23 ऑगस्ट रोजी राज्याच्या डॉ. एनटीआर विद्या सेवा ट्रस्ट आरोग्यविभागाने देऊन टाकले. जनरल अॅडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंटने ऑर्डर क्रमांक 1844 नुसार हे पैसे देऊन टाकले. या विभागाचे सचिव श्रीकांत नागुलापल्ली यांनी या ऑर्डरसाठी अर्थ मंत्रालयाच्या कोणत्याही परवानगीची गरज नसल्याचे स्पष्ट केले. हे पैसे आता मंत्रिमहोदयांच्या पगाराच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत.
#AndhraPradesh government headed by chief minister #chandrababunaidu has reimbursed Rs 2.8 lakh to state #FinanceMinister#YanamalaRamakrishnudu for undergoing a very simple treatment for his toothache problem. (GO copy image) pic.twitter.com/F6qGsJ4Igu
— SWAMY (@SwamyJourno) August 23, 2018
यनमाला रामकृष्णुडू हे आंध्र प्रदेशचे विभाजन झाल्यानंतर उर्वरित राज्याच्या अर्थ खात्याची धुरा सांभाळत आहेत. एकीकडे निधी कमी पडत असल्याने अनेक आघाड्यांवर राज्य सरकारला पैसे उभे करावे लागत आहे. नव्या राज्याची नवी राजधानी अमरावती येथे बांधण्यासाठी राज्य सरकारने 2000 कोटी रुपयांचे रोखे लोकांना दिले. त्यामध्ये 10.32 टक्के व्याजदरही निश्चित करण्यात आला. मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू अमरावती हे आरोग्यसेवांचे एक मोठे केंद्र असेल अशी घोषणा नेहमी करत असतात. मात्र आता त्यांच्याच अर्थमंत्र्यांनी दातांच्या उपचारांसाठी सिंगापूरला जाऊन करदात्यांचा पैसा वाया घालवल्याबद्दल त्यांच्यावर टीका होत आहे. रुट कॅनलचे उपचार आंध्र प्रदेशात किंवा भारतात इतरत्र उपलब्ध नाहीत का असा प्रश्न आंध्र सरकारला समाजमाध्यमावर विचारला जात आहे.