चंद्राबाबू नायडू यांच्या अटकेच्या निषेधार्थ टीडीपीकडून आंध्र प्रदेश बंदची हाक, पवन कल्याण यांचा पाठिंबा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2023 09:56 AM2023-09-11T09:56:30+5:302023-09-11T09:56:38+5:30
पवन कल्याण यांच्या जनसेना पक्षाने (जेएसपी) या बंदला पाठिंबा दिला आहे.
विजयवाडा : आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांच्या अटकेनंतर राज्यात निदर्शने तीव्र झाली आहेत. सरकारी निधीचा गैरवापर केल्याप्रकरणी माजी मुख्यमंत्र्यांना अटक केल्याच्या निषेधार्थ तेलगू देसम पार्टीने (टीडीपी) सोमवारी आंध्र प्रदेश बंदची हाक दिली आहे. याचबरोबर, पवन कल्याण यांच्या जनसेना पक्षाने (जेएसपी) या बंदला पाठिंबा दिला आहे.
आंध्र प्रदेश राज्य कौशल्य विकास महामंडळातील कथित भ्रष्टाचाराच्या प्रकरणात चंद्राबाबू नायडू यांना शनिवारी (9 सप्टेंबर) सीआयडीने नंदयाल येथून अटक केली होती. एका दिवसानंतर, चंद्राबाबू नायडू यांना रविवारी (10 सप्टेंबर) सकाळी विजयवाडा न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी त्यांना 23 सप्टेंबरपर्यंत म्हणजेच 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, एका निवेदनात आंध्र प्रदेश टीडीपीचे अध्यक्ष के अचन्नयडू यांनी पक्षाचे कार्यकर्ते, सामान्य लोक आणि नागरी समाजाला आंदोलनात सहभागी होऊन ते यशस्वी करण्याची विनंती केली.
300 कोटी रुपयांचा घोटाळा
आंध्र प्रदेश राज्य कौशल्य विकास महामंडळातील कथित घोटाळ्याप्रकरणी विजयवाडा येथील स्थानिक न्यायालयाने चंद्राबाबू नायडू यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दरम्यान, आंध्र प्रदेश सीआयडीचे प्रमुख एन संजय यांनी शनिवारी सांगितले की, कौशल्य विकास महामंडळाच्या निधीच्या गैरवापराशी संबंधित फसवणूक प्रकरणात चंद्राबाबू नायडू यांना अटक करण्यात आली आहे. हा घोटाळा 300 कोटी रुपयांचा आहे.
पवन कल्याण यांचा राज्य सरकारवर निशाणा
जनसेना पक्षाचे प्रमुख पवन कल्याण यांनी आंध्र प्रदेशातील सत्ताधारी वायएसआर काँग्रेसवर 'असामाजिक कृत्ये' केल्याचा आरोप केला. राज्यातील जगन मोहन सरकार विरोधी पक्षांना त्रास देत असल्याचा आरोपही त्यांनी केला. एका निवेदनात पवन कल्याण यांनी जेएसपी कार्यकर्त्यांना बंदमध्ये शांततेने सहभागी होण्यास सांगितले.
शहरात कलम 144 लागू
चंद्राबाबू नायडू यांना 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवल्यानंतर त्यांना राजमुंदरी मध्यवर्ती कारागृहात नेण्यात आले आहे. दरम्यान, कारागृहात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. विजयवाडा न्यायालयाच्या परिसरात मोठ्या संख्येने टीडीपी कार्यकर्ते जमले असतानाही पोलीस अधिकाऱ्यांनी चंद्राबाबू नायडूंना मध्यवर्ती कारागृहात घेऊन गेले. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी राजमुंदरी पोलिसांनी शहराच्या हद्दीत कलम 144 लागू केले आहे.