आंध्र प्रदेशात विषारी वायू गळतीमुळे 95 जण रुग्णालयात दाखल, उच्चस्तरीय चौकशीचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2022 03:17 PM2022-08-03T15:17:01+5:302022-08-03T15:17:40+5:30
Andhra Pradesh Gas leak: याप्रकरणी मंत्री जी. गुडीवाडा अमरनाथ यांनी घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत.
विशाखापट्टणम: आंध्र प्रदेशातील अच्युतापुरम येथील एका बियाणे कंपनीत गॅस गळती झाल्याची घटना घडली. या गॅस गळती झाल्यामुळे आतापर्यंत एकूण 95 जणांना विविध रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आतापर्यंत एकूण 121 जण आजारी पडले आहेत. दरम्यान, याप्रकरणी मंत्री जी. गुडीवाडा अमरनाथ यांनी घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच, नमुने आयसीएमआरकडे (ICMR) तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. जेणेकरून हे जाणूनबुजून केले गेले की नाही हे कळू शकेल.
ही घटना मंगळवारी संध्याकाळी घडली. ही कंपनी अनकपल्ली जिल्ह्यातील अच्युतपुरम परिसरात आहे. गॅस गळतीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. अनकापल्ले जिल्हा वैद्यकीय व आरोग्य अधिकारी हेमंत यांनी सांगितले की, येथे दाखल असलेल्या सर्व 53 रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. बहुतेक लोकांनी श्वास घेण्यास त्रास होणे, उलट्या होणे अशी तक्रार केली आहे. काल 94 कामगारांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, त्यापैकी 53 सरकारी रुग्णालयात दाखल आहेत. उर्वरित 41 जणांना जिल्ह्यातील विविध रुग्णालयात दाखल करण्यात आले. गॅस गळतीनंतर जवळपास 50 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यात बहुतांश महिला होत्या.
याआधीही अशा घटना
जून महिन्यातच विशाखापट्टणममध्ये अशीच एक घटना घडली होती. ज्यामध्ये 140 कामगारांना रुग्णालयात दाखल करावे लागले. पोरस प्रयोगशाळेतील या गॅस गळतीत अनेक कर्मचारी जागीच बेशुद्ध पडले होते. दोन महिन्यांपूर्वी अच्युतापुरम सेझमध्ये गॅस गळती झाली होती. त्यानंतर गॅस गळतीमुळे सुमारे 200 महिला कामगार आजारी पडल्या.