जगन मोहन सरकार आपल्या राज्यातील प्रत्येक गावात मंदिर बांधणार!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2023 05:07 PM2023-03-01T17:07:23+5:302023-03-01T17:08:15+5:30
मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांच्या सूचनेनुसार हा उपक्रम हिंदू धर्माचे संरक्षण आणि प्रचार करण्यासाठी सुरू करण्यात आला आहे, असे उपमुख्यमंत्री कोट्टू सत्यनारायण यांनी सांगितले.
आंध्र प्रदेश सरकार राज्यातील प्रत्येक गावात मंदिर बांधणार आहे. प्रत्येक गावात एक मंदिर असावे, हे विचारात घेऊन राज्यात मोठ्या प्रमाणावर मंदिरांची उभारणी सुरू असल्याचे सरकारने म्हटले आहे. मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांच्या सूचनेनुसार हा उपक्रम हिंदू धर्माचे संरक्षण आणि प्रचार करण्यासाठी सुरू करण्यात आला आहे, असे उपमुख्यमंत्री कोट्टू सत्यनारायण यांनी सांगितले.
"हिंदू धर्माचे मोठ्या प्रमाणावर संरक्षण आणि प्रचार करण्यासाठी दुर्बल घटकांच्या भागात हिंदू मंदिरांचे बांधकाम सुरू करण्यात आले आहे," असे उपमुख्यमंत्री कोट्टू सत्यनारायण यांनी मंगळवारी एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. तिरुमला तिरुपती देवस्थानमच्या श्री वाणी ट्रस्टने मंदिरांच्या बांधकामासाठी प्रत्येकी 10 लाख रुपये दिले आहेत. 1,330 मंदिरांचे बांधकाम सुरू झाल्यानंतर, यादीत आणखी 1,465 मंदिरांची योजना आखली आहे. तसेच, काही आमदारांच्या विनंतीवरून आणखी 200 मंदिरे बांधली जाणार आहेत. उपमुख्यमंत्री कोट्टू सत्यनारायण म्हणाले की, उर्वरित मंदिरे इतर स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने बांधली जातील.
उपमुख्यमंत्र्यांच्या म्हणण्यानुसार, एंडोमेंट विभागांतर्गत (Endowments Department) 978 मंदिरांचे बांधकाम वेगाने सुरू आहे, तर प्रत्येक 25 मंदिरांचे काम एका सहाय्यक अभियंत्याकडे सोपविण्यात आले आहे. ते म्हणाले की, काही मंदिरांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी आणि मंदिरांमध्ये धार्मिक विधी करण्यासाठी वाटप केलेल्या 270 कोटी रुपयांच्या सीजीएफ निधीपैकी 238 कोटी रुपये आधीच जारी करण्यात आले आहेत. तसेच, या आर्थिक वर्षात 5000 रुपये प्रति मंदिर दराने धार्मिक विधी (धूप-दीप नैवेद्यम) निधीसाठी राखून ठेवलेल्या 28 कोटींपैकी 15 कोटी रुपये संपले आहेत. 2019 पर्यंत धूप-दीप योजनेअंतर्गत केवळ 1561 मंदिरांची नोंदणी होती, जी आता 5000 झाली आहे, असे कोट्टू सत्यनारायण यांनी सांगितले.
याचबरोबर, मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांच्या नेतृत्वाखालील वायएसआरसी सरकारने राज्यभरातील मंदिरांच्या विकासाला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे, असे उपमुख्यमंत्री कोट्टू सत्यनारायण म्हणाले. तसेच, एंडोमेंट्स विभाग प्रत्येक मंदिरासाठी 10 लाख रुपये देऊन 3,000 मंदिरे विकसित आणि नूतनीकरण करण्याची योजना आखत आहे. यापूर्वीच जगन मोहन सरकारने 26 जिल्ह्यांमध्ये 1400 मंदिरे बांधण्याची घोषणा केली आहे. त्यापैकी 1030 बांधकामे सरकार स्वत: तर 330 समरसथ सेवा फाऊंडेशन बांधत आहेत. विशेष म्हणजे, हे फाउंडेशन आरएसएसशी संलग्न एनजीओ आहे. प्रत्येक मंदिरासाठी 8-8 लाख आणि मूर्तीसाठी 2-2 लाख रुपयांची तरतूद आहे, असेही उपमुख्यमंत्री कोट्टू सत्यनारायण यांनी सांगितले.