चंद्राबाबू नायडू यांना उच्च न्यायालयाचा झटका, तीन याचिका फेटाळल्या
By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2023 12:58 PM2023-10-09T12:58:24+5:302023-10-09T13:02:09+5:30
चंद्राबाबू नायडू यांच्याद्वारे विविध प्रकरणात दाखल करण्यात आलेल्या तीन याचिका उच्च न्यायालयाने फेटाळल्या आहेत.
आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाने पुन्हा एकदा टीडीपी प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांना झटका दिला आहे. चंद्राबाबू नायडू यांच्याद्वारे विविध प्रकरणात दाखल करण्यात आलेल्या तीन याचिका उच्च न्यायालयाने फेटाळल्या आहेत. याबाबतची माहिती चंद्रबाबू नायडू यांचे वकील कृष्णा मूर्ती यांनी दिली आहे.
"आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाने माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांची इनर रिंग रोड, फायबर नेट आणि अंगल्लू 307 प्रकरणांमध्ये जामीन अर्ज फेटाळला आहे", असे वकील कृष्णा मूर्ती यांनी सांगितले. दरम्यान, याआधी विजयवाडा लाचलुचपत प्रतिबंधक ब्युरो (ACB) न्यायालयाने माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या जामीन याचिकेवरील निर्णय राखून ठेवला आहे. कथित कोट्यवधी रुपयांच्या कौशल्य विकास घोटाळ्याप्रकरणी एसीबी न्यायालयाने त्यांच्या कोठडीत 19 ऑक्टोबरपर्यंत वाढ केली.
दरम्यान, आंध्र प्रदेश राज्य कौशल्य विकास महामंडळातील कथित भ्रष्टाचाराच्या प्रकरणात माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांना 9 सप्टेंबरला सीआयडीने नंदयाल येथून अटक केली होती. त्यामुळे राज्यात राजकीय खळबळ उडाली होती. अनेक टीडीपी नेत्यांनी चंद्राबाबू नायडू यांना खोट्या आरोपांचा आधारे अटक करण्यात आल्याचा आरोप केला होता.